पदवीच्या १.७४ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर
By योगेश पायघन | Published: August 6, 2022 11:38 PM2022-08-06T23:38:23+5:302022-08-06T23:39:21+5:30
विद्यापीठ संकेतस्थळावर ऑनलाईन बघा निकाल
योगेश पायघन औरंगाबाद: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांचे निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाले. बीए, बीकॉम बीएसस्सी मध्ये १ लाख ९८ हजार ८०५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ७६४ (८७.९० टक्के) विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. हे निकाल विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले.
पदवी परीक्षांच्या मुल्यमापनाचे काम दोन दिवसांपुर्वी पुर्ण झाले होते. मात्र, त्रुटी कमी करण्यासाठी सर्व प्रक्रीया करून निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले आग्रही होते. त्यानुसार सर्व प्रक्रीया पुर्ण झाल्यावर शनिवारी सायंकाळी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आले. यात बीकाॅमचे २१ हजार ४४, बीएचे २३ हजार ७९२ तर बीएसस्सीचे ५२ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल जाहीर होताच विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रकही जाहीर झाले. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी १७ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. तर २९ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन ३ सप्टेंबरपासून समुपदेशन व प्रवेश फेरीला सुरूवात होईल.
बी. काॅमचे २१ हजार ४४ विद्यार्थी उत्तीर्ण
बी काॅममध्ये सहा सत्राचे ४२ बजार ७२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७ हजार ४४६ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. त्यात पुढच्या सत्रात शिकतांना मागच्या सेमिस्टरचे अनुत्तीर्ण विषयाचे ५ हजार २८१, उत्तीर्ण झालेले २१ हजार ४४ तर एटीकेटीत १४ हजार ३८७ विद्यार्थी अडकले आहेत.
बीए मध्ये केवळ २३ हजार ७९२ जण उत्तीर्ण
बीएच्या सहा सत्राच्या परिक्षेसाठी ६१ हजार ८९५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५३ बजार ४७४ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. बॅक राहीलेल्या ९ हजार ५५१, पास झालेल्या २३ हजार ७९२, एटीकेटी १९ हजार २८१ तर नापास विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार १०३ आहे.
बीएसस्सीत तब्बल ४२ हजार १५५ विद्यार्थी नापास
बीएसस्सीच्या परिक्षेत सर्वाधिक ९४ हजार १८३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८३ हजार ८४३ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. त्यात बॅक राहीलेल्या ११ हजार ४६, उत्तीर्ण झालेल्या ५२ हजार २८ तर एटीकेटी २० हजार ९६६ तर नापास झालेल्यांची संख्या ४२ हजार १५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.