Education: पहिली ते सातवीचे वर्ग भरणार, पहिली घंटा १७ ऑगस्टपासून; ८ वी ते १० वीच्या वर्गांना अल्प प्रतिसाद
By अतुल कुलकर्णी | Published: August 7, 2021 07:11 AM2021-08-07T07:11:19+5:302021-08-07T07:12:21+5:30
Education News: कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.
इयत्ता ८ वी ते १० वीच्या ३६,८३५ पैकी १२,७२५ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात ८६,३३,८०५ विद्यार्थ्यांपैकी ८,९८,८९४ विद्यार्थी शाळेत येत आहेत. एकूण शाळांच्या ३४.५५ टक्के शाळा सुरू झाल्या मात्र, त्यात फक्त १०.४१ टक्के विद्यार्थ्यांनीच थेट वर्गात येणे पसंत केले आहे. लातूर, अमरावती, नागपूर या तीन विभागात सर्वाधिक विद्यार्थी शाळेत आले आहेत.
पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.
शाळांना ‘एसओपी’ पुढील आठवड्यात
पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? जेवणाचे डबे, मध्यंतराची सुट्टी, खेळाचे वर्ग या सगळ्यांचे नियोजन कसे असावे? याविषयीची ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू असून ती येत्या आठवड्यात सर्व शाळांना पाठवली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.
फीबाबत पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा
शाळांची फी कमी करण्याविषयी चर्चा सुरू होती. त्याचे पुढे काय झाले असे विचारले असता त्या म्हणाल्या, याबद्दल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल. शाळा सुरू झाल्यानंतर काय ठरवायचे, यावरही बैठकीत चर्चा होईल.
राज्यात आरटीईचे ६० टक्के प्रवेश पूर्ण
- यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्यातरी बंद आहेत. अशा परिस्थितीत
आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसादही थंडावला आहे.
- अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झालेले नाहीत.
- शिक्षण संचालनालयाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीच्या अंतिम मुदतीत राज्यात एकूण रिक्त जागांच्या जवळपास ६० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.
- आरटीईअंतर्गत ९,४३२ शाळांमध्ये ९६,६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले.
- पण पालकांकडून कमी प्रतिसाद मिळाला आणि आवश्यक तेवढे प्रवेश होऊ शकले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.