शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; ११ वीच्या प्रवेशासाठी CET परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 09:45 PM2021-06-24T21:45:02+5:302021-06-24T21:47:07+5:30

ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे

Education Minister Varsha Gaikwad announcement; decision regarding CET exam for 11th admission | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; ११ वीच्या प्रवेशासाठी CET परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; ११ वीच्या प्रवेशासाठी CET परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देCET राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतीलपरीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती

मुंबई - दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावीच्या प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, CBSE, CISCE व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

कशी असणार CET परीक्षा?

CET राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल.यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.परीक्षा offline घेण्यात येईल. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत १५ जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल अशी माहितीही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. या परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावीचे प्रवेश कसे होणार? याबाबत विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम होता. त्यानुसार ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल. या सामाईक परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असून १०० मार्कांची एक प्रश्नपत्रिका असेल. या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित आणि विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.

सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्य प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर उर्वरित जागांवर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील. त्यांना १० वीच्या मुल्यमापन पद्धतीनुसार गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येतील.

Web Title: Education Minister Varsha Gaikwad announcement; decision regarding CET exam for 11th admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.