Education News:पोराबाळांना शिकवायचं कोणी, देशात गुरुजींची तब्बल १० लाख पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:09 AM2022-01-30T07:09:27+5:302022-01-30T07:10:02+5:30
Education News: देशात काेराेना महामारीमुळे अनेकांवर बेराेजगारीचे माेठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गाेंधळावरून तरुणांनी आंदाेलन केले. सरकारने मनात आणल्यास लाखाे तरुणांना नाेकरी मिळू शकते.
नवी दिल्ली : देशात काेराेना महामारीमुळे अनेकांवर बेराेजगारीचे माेठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गाेंधळावरून तरुणांनी आंदाेलन केले. सरकारने मनात आणल्यास लाखाे तरुणांना नाेकरी मिळू शकते. सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार केंद्रात लाखाे पदे रिक्त आहेत. मात्र, ती भरण्याची प्रक्रिया संथपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
त्यानुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्रात ८ लाख ७२ हजार पदे रिक्त हाेती. शिक्षकांच्या रिक्त जागा जोडल्यास हा आकडा १८ लाखांवर जातो. मंजूर पदांची संख्या ४० लाखांहून अधिक असून, २१ टक्के पदे रिक्त आहेत. रेल्वे मंत्रालयात २ लाख ३७ हजार पदे रिक्त आहेत. मंजूर पदांच्या संख्येनुसार हा आकडा १५ टक्के आहे. गृहमंत्रालयात १ लाख २८ हजार ८४२, विज्ञान व तंत्रज्ञान विभागात ८ हजार २२७ पदे रिक्त आहेत. दरवर्षी एक काेटी नाेकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पंतप्रधान कार्यालयातही २६ टक्के पदे रिक्त आहेत. निती आयाेगातही इतर मंत्रालयांप्रमाणे माेठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. देशातील सार्वजनिक बँकांमध्येही ४१ हजार पदे रिक्त आहेत. देशभरात ६१ लाख ८४ हजार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १०.६ लाख पदे रिक्त आहेत.
२ वर्षांतही वाढ
- दोन वर्षांमध्ये रिक्त पदांमध्ये आणखी वाढ झाली असल्याचीही शक्यता आहे़ तसेच काही प्रमाणात नोकरभरतीही झालेली असू शकते.
-सपाचे खासदार सुखरामसिंह यादव यासंदर्भात प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत उत्तर दिले हाेते.
रक्ताने लिहिली पत्रे
ही पदे कधीपासून आणि का रिक्त आहेत, याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह काेणतीही माहिती दिली नाही. शिक्षकांची १० लाखांहून अधिक रिक्त पदे आहेत. मध्य प्रदेशात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनी माेदी सरकारला स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून नाेकरी देण्याची मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.