२७०० मुलांचे शिक्षण बंद! ‘मिशन झीरो ड्रॉप आऊट’ मध्ये समोर आले भीषण वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 07:10 AM2022-08-06T07:10:02+5:302022-08-06T07:10:12+5:30
कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ ते २० जुलैदरम्यान राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडमुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाली. या मुलांचा शोध घेण्यासाठी शासनाच्या सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन राबविलेल्या ‘मिशन झीरो ड्रॉप आउट’ मोहिमेत मुंबई विभागात २,७५७ मुले शाळाबाह्य झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर तसेच रायगड, पालघर, बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे या जिल्ह्यांतील मिळून ३ ते १८ वयोगटातील आतापर्यंत कधीच शाळेत न गेलेली आणि अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ७०० हून अधिक असल्याची परिस्थिती मिशन झीरो ड्रॉप आउट मोहिमेतील समिती सदस्यांनी मांडली आहे. दरम्यान, मिशन झीरो ड्रॉप आउटचे उद्दिष्ट समोर ठेवून या मोहिमेसाठी गठित समितीकडून या सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या २ वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळाबाह्य होण्याची कारणे अनेक असून, अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांचे शिक्षण थांबू नये यासाठी राज्यात मार्च २०२१ मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.
बालकामगारांचाही समावेश
मिशन झीरो ड्रॉप आउट या मोहिमेत मुंबई विभागात शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये बालकामगार आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालकामगार असून, मुंबई विभागातील एकूण बालकामगारांची संख्या १२, तर विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या ४७ आहे. त्यामुळे अन्य कारणांमुळे शाळाबाह्य झालेले विद्यार्थी २ हजार ६९८ आहेत.
अनियमित उपस्थितीमुळे मुले शाळाबाह्य
कोविड काळात अनेक पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे स्थलांतर करावे लागले. त्यामुळे या काळात अनेक मुलांची शाळांतील उपस्थिती अनियमित झाली. परिणामी ही मुले शाळाबाह्य ठरली. मुंबई विभागात अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, या विद्यर्थ्यांची संख्या १ हजार ९०० हून अधिक आहे. पालघर जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक असून, अनियमित असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८१० आहे. यामध्ये शाळेत अनियमित असणाऱ्या मुला-मुलींच्या संख्येत फारसा फरक नसून मुलांची संख्या ९७३, तर मुलींची संख्या ९६६ आहे.
८००
हून अधिक मुले कधीच शाळेत नाहीत
मिशन झीरो ड्रॉप आउट मोहिमेत ३ ते १८ वयोगटातील ८०८ मुले ही आतापर्यंत कधीच शाळेत गेली नसल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
यामध्ये दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबईमधील २०, रायगडमधील ३४, पालघरमधील १९६ मुलांचा समावेश आहे.
मनपातील ११७, तर ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ४०४ मुलांचा समावेशही यामध्ये आहे.
या आकडेवारीनुसार मुंबई विभागातील कधीही शाळेत न गेलेल्या मुलांमध्ये ४२५ मुले आणि ३८३ मुलींचा समावेश आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ ते २० जुलैदरम्यान राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली.