Education: निकाल लागला, प्रवेश अर्ज वेळेत भरा! अकरावी, आयटीआय, डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये रंगणार चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:38 AM2022-06-19T08:38:39+5:302022-06-19T08:39:25+5:30
Education News:
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला असला, तरी विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रवेशाची परीक्षा आणि त्याची स्पर्धा अद्याप कायम असून केंद्रीय मंडळाचे निकाल लागले नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची धास्ती वाढली आहे. विद्यार्थ्यांनी त्याची वाट न पाहता आपल्याला ज्या शाखेला, अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी अर्ज नोंदणी करून ठेवण्याचे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन विविध संचालनालयांकडून करण्यात येत आहे.
दहावीनंतर आयटीआय, अकरावी, डिप्लोमा प्रवेश हे प्रवेशाचे मुख्य पर्याय उपलब्ध असून त्यांच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान विहित वेळेत अर्ज नोंदणी करून प्रवेशाच्या स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन विविध संचालनालयाकडून करण्यात येत आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा निकालात व गुणवंतांच्या संख्येत घट असली, तरी केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांमुळे नामांकित महाविद्यालयातील, शिक्षण संस्थातील उपलब्ध जागांसाठीची नेहमीची चुरस रंगणार आहे, हे निश्चित असल्याचे मत प्राचार्य व्यक्त करीत आहेत. सद्यस्थितीत केवळ केंद्रीय मंडळांचा निकाल न लागल्याने चित्र स्पष्ट नाही, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली पूर्वतयारी न सोडता किमान अर्ज नोंदणीची प्राथमिक प्रक्रिया पार पाडत पहिला टप्पा पूर्ण करावा.
अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा लवकरच
राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू झाली असून दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
डिप्लोमासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या प्रवेशासाठी साधारण एक लाख जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत.
आयटीआयची प्रवेश प्रक्रिया
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाली आहे.