मराठीची शाळा : 'दीड शहाणा' शब्द आला कुठून अन् कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:58 PM2019-08-20T12:58:29+5:302019-08-20T13:09:21+5:30
शहाणा शब्द मूळचा कोणत्या भाषेतला माहितीय?
>> साधना गोरे
मुलांनो, तुम्ही आईचं एखादं काम केलं की आई ‘शहाणा राजा’ म्हणून तुमचं कौतुक करते. आपल्याला सगळ्यांनी शहाणं म्हणावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. तुम्हा मुलांनाच काय मोठ्या माणसांचीही हीच इच्छा असते. असं म्हटलं जातं की, वयानुसार अनुभव येत जातो तसतसा माणूस शहाणा होतो. पण हा शहाणा शब्द मूळचा कोणत्या भाषेतला माहितीय?
आपल्या मराठी भाषेतले बरेचसे शब्द संस्कृतमधून आलेले आहेत, तसा शहाणा शब्दही संस्कृतमधूनच आलेला आहे. संस्कृतमध्ये ‘ज्ञान’ या शब्दाच्या आधी ‘सं’ हे अक्षर लागून तयार झालेला शब्द म्हणजे ‘संज्ञान’. एखाद्या गोष्टीची सर्व बाजूने माहिती असणे, जाण असणे म्हणजे संज्ञान. ‘संज्ञान’ या शब्दापासून हिंदी आणि उर्दू भाषेत तयार झालेला शब्द म्हणजे ‘सयान’. ‘सयान’ म्हणजेही बुद्धिमानी, चतुराई. या ‘सयान’ शब्दापासून तयार झाला सयाना, ज्याचा अर्थ चतुर, बुद्धिमान मनुष्य.
एखादा माणूस गरजेपेक्षा जास्त चतुराई दाखवत असेल तर ‘जास्त शहाणपणा दाखवू नकोस’ असंही म्हटलं जातं. नेपाळी भाषेप्रमाणे मुंबईया हिंदीमध्ये ‘श्याना’, ‘श्याणा’ असं म्हणण्याची पद्धत आहे. गरजेपेक्षा जास्त शहाणपण दाखवणाऱ्याला मराठीत ‘दीडशहाणा’ म्हटलं जातं. याच अर्थाने उर्दू आणि हिंदीमध्ये ‘डेढअक्कल’ म्हणण्याची पद्धत आहे. मराठीपेक्षा अगदी वेगळ्या असणाऱ्या गौंडीसारख्या आदिवासी समाजाच्या भाषेतही ‘शहाणा’ शब्द आहे.
पूर्वीच्या काळात मुली वयात आल्या की घरात त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू होत. त्या अर्थाने ‘मुलगी शहाणी झाली’ असं म्हणण्याची पद्धत होती. म्हणजे वयानुसार शहाणपणा येतो असं इथे गृहीत धरलं आहे. मराठीत ‘शहाणे’ हे आडनावही आहे.
(लेखिका मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत.)