Education: यंदा पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:22 PM2022-06-25T13:22:06+5:302022-06-25T13:24:03+5:30

Education News: २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे. 

Education: This year 1st to 12th syllabus is 100 percent | Education: यंदा पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम १०० टक्के

Education: यंदा पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम १०० टक्के

Next

मुंबई : राज्यात दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमांवर घेतल्या, तर प्रात्यक्षिकांसाठी ४० टक्के अभ्यासक्रम होता. तसेच पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती, मात्र २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे शाळा सलग सुरू नव्हत्या. अनेक ठिकाणी शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले, मात्र अपुरी इंटरनेट सुविधा, नेटवर्क नसणे, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसणे, अशा विविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आल्या. यावर उपाय म्हणून एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद)कडून इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे या इयत्तांच्या परीक्षा या ७५ टक्के अभ्यासक्रमावरच घेण्यात आल्या. यंदाचे शैक्षणिक वर्ष हे वेळेवरच सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या शाळा या नियमित पद्धतीने, पूर्ण वेळ सुरू आहेत. विदर्भातील शाळाही येत्या २७ जूनपासून सुरू होणार असल्याने सद्य:स्थितीत शाळांच्या वेळेत किंवा तासिकांत कोणताही अडथळा नसून त्या त्या योग्य पद्धतीने सुरू असल्याने अभ्यासक्रम पूर्ववत म्हणजे १०० टक्के करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. 

१०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा अवधी
कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग मंदावला होता. शिवाय बऱ्याच कालावधीनंतर  परीक्षांना सामोरे जाणार होते. त्यामुळे राज्य मंडळाने विशेष बाब म्हणून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार १५ ते ३० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. मात्र यापुढे परीक्षेसाठी कोणताही अधिक कालावधी राहणार नाही. त्यानुसार विद्यार्थ्यांना १०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Education: This year 1st to 12th syllabus is 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.