इंजिनीअरिंग प्रवेशाचा रेकॉर्ड; तब्बल १.४० लाख विद्यार्थ्यांची नोंद, आणखी वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 06:19 AM2024-09-14T06:19:04+5:302024-09-14T06:19:44+5:30
पुढील दोन दिवसांत प्रवेश आणखी वाढण्याची शक्यता
अमर शैला
मुंबई : राज्यात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना यंदा सुगीचे दिवस आले असून यंदा इंजिनीअरिंग शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना विक्रमी अशा १ लाख ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून इंजिनीअरिंगच्या जवळपास ७८ टक्के जागा भरल्याचे सीईटी सेलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच संस्था पातळीवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून, पुढील काही दिवसांत यात वाढीची शक्यताही वर्तविली जात आहे.
राज्यात यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या विविध कोट्यांतून एकूण १ लाख ७९ हजार ८७७ हजार उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत त्यातील ३९ हजार ४४७ जागा रिक्त आहेत. अद्याप विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुढील दोन दिवसांची मुदत आहे. त्यातून आणखी काही प्रवेश निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यात तब्बल २२,४९२ एवढी भरघोस वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात १,१७,९३८ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता. तर कोरोनापूर्वी २०१९-२०२० मध्ये ही संख्या ७१,३५० एवढी होती.
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार यंदाही प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात तब्बल १,९७,३९८ विद्यार्थ्यांनी कॅप फेऱ्यांतून प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने अडचणीत आलेल्या इंजिनीअरिंग महाविद्यालयांना यामुळे सुगीचे दिवस येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदाही राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि त्यासंबंधित शाखांना सर्वाधिक जागा असून, त्याच शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.