Engineering fees: इंजिनीअरिंग शुल्क आता नियंत्रणात, यापुढे दरवर्षी केवळ ५ टक्केच वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:23 AM2022-04-10T07:23:12+5:302022-04-10T07:23:47+5:30
Engineering fees: इंजिनीअरिंग कॉलेजांकडून भरमसाठ पद्धतीने वाढविल्या जाणाऱ्या शुल्कांना आता लगाम लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रथमच इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : इंजिनीअरिंग कॉलेजांकडून भरमसाठ पद्धतीने वाढविल्या जाणाऱ्या शुल्कांना आता लगाम लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रथमच इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक
शुल्क ७९ हजार रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क १.४१ लाख रुपये असेल. शुल्क आकारणीचा निर्णय २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट सायन्स अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एका समतिची स्थापना करण्यात आली होती. या समितीने ४ वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे (बीटेक व बीई) कमाल वार्षिक शुल्क ग्रामीण भागासाठी १.४४ लाख रुपये, तर शहरी भागातील कॉलेजांसाठी १.५८ लाख रुपये निश्चित केले होते. मात्र, न्या. श्रीकृष्ण समितीने किमान शुल्क निश्चित केले नव्हते.
आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यांत किमान शुल्क ३० ते ३५ हजार निश्चित केले होते. त्याला खासगी महाविद्यालयांनी विरोध करून किमान शुल्क निश्चित करण्याची मागणी एआयसीटीईला केली होती. त्यानुसार, आता ६ वर्षांनंतर किमान शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
असे असेल शुल्क
पदवी (बी टेक) : कमाल वार्षिक
शुल्क : १.८९लाख रुपये
पदव्युत्तर (एम टेक) कमाल वार्षिक शुल्क : ३.०३ लाख रुपये
शुल्कात दरवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा अधिकार इंजिनीअरिंग कॉलेजांना असतील. एआयसीटीईद्वारा संचलित सर्व इंजिनीअरिंग कॉलेजांना ही शुल्करचना लागू असेल.