इंग्रजी भाषा चाचणी; ६२ टक्के भारतीयांना उच्चारांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:18 IST2025-02-24T09:18:07+5:302025-02-24T09:18:17+5:30
अभ्यास, काम व पर्यटन व्हिसासाठी ‘पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश’ने केलेल्या सामाजिक धारणा सर्वेक्षणातून मिळालेली माहिती या अहवालात उघड झाली आहे.

इंग्रजी भाषा चाचणी; ६२ टक्के भारतीयांना उच्चारांची चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतात इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या ६२ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना वाटते की त्यांच्या भारतीय उच्चारांचा त्यांच्या बोलण्याच्या कौशल्याच्या परीक्षेच्या निकालावर नकारात्मक परिणाम होईल, तर ७४ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना वाटते की जेव्हा ते परीक्षकांसमोर प्रत्यक्ष परीक्षेला बसतात तेव्हा त्यांच्या दिसण्याचा त्यांच्या परीक्षेतील गुणांवर परिणाम होऊ शकतो. पिअर्सनच्या सर्वेक्षण अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
अभ्यास, काम व पर्यटन व्हिसासाठी ‘पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश’ने केलेल्या सामाजिक धारणा सर्वेक्षणातून मिळालेली माहिती या अहवालात उघड झाली आहे. परीक्षार्थ्यांच्या धारणांबद्दल, विशेषतः रंग-रूप, उच्चार आणि पोशाखाबद्दल असलेल्या पूर्वग्रहांबद्दल माहिती देताना या अहवालात केवळ विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर आणि क्षमतांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या निष्पक्ष प्रणालींची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. ही माहिती १,००० जणांच्या सर्वेक्षणावर आधारित आहेत.
तर आदराची वागणूक
९६ टक्के जणांनी वैयक्तिक परीक्षकांबरोबर इंग्रजी भाषेची परीक्षा दिली होती. सर्वेक्षणानुसार, ५९ टक्के जणांना असा विश्वास आहे की त्यांच्या त्वचेच्या रंगावर आधारित त्यांना वेगळी वागणूक दिली जाईल. जवळजवळ ६४ टक्के परीक्षार्थ्यांना असे वाटले की ते ज्या पद्धतीने कपडे घालतात त्यावरून त्यांना चुकीचे गृहीत धरले जाऊ शकते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील १० पैकी सात जणांना असे वाटते की जर त्यांच्याकडे उत्तम नोकरी असेल किंवा त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असेल तर त्यांना अधिक आदराने वागवले जाईल.
निकालांवर परिणाम
सर्वेक्षणानुसार, पाचपैकी तीन (६३ टक्के) उमेदवार, विशेषतः आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील, असे मानतात की इंग्रजी बोलताना भारतीय उच्चार न स्वीकारल्याने त्यांच्या परीक्षेतील गुणांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादी व्यक्ती बाहेरून कशी दिसते, याचाही त्याच्या निकालांवर परिणाम होतो, असे मानले जाते. पंजाबमध्ये हे सर्वात जास्त जाणवते, जिथे राज्यातील ७७ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की त्यांचा पोशाख त्यांच्या बोलण्याच्या चाचणीच्या निकालांवर परिणाम करू शकतो. तामिळनाडूमधील लोकांसह ३५ टक्के परीक्षार्थ्यांचा असा विश्वास आहे की, अमेरिकन उच्चार चांगले गुण मिळविण्यात योगदान देतात, तर २१ टक्के, विशेषतः उत्तर प्रदेशातील, म्हणाले की ब्रिटिश उच्चार त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील.