इस्टेफॅनीयाची शाळा आणि... येस, वी कॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:17 AM2023-12-20T09:17:36+5:302023-12-20T09:17:44+5:30
आज येस वी कॅन फाउंडेशनने व्यावसायिक शिक्षक घेऊन तीन बसमधल्या आणि चार निर्वासित छावण्यांमध्ये शाळा सुरू केल्या आहेत. २०१९ सालापासून या १० देशांतील ३१०० मुलांना शिक्षण देण्यात आलं आहे.
इस्टेफॅनीया रेबेलॉन या ३२ वर्षीय महिलेचं बरंचसं आयुष्य तसं खडतर गेलं. तिच्या आयुष्याची सुरुवातीची अनेक वर्षे तिच्या कुटुंबाने कोलंबियातून पळून आलेले आश्रित म्हणून अमेरिकन नागरिकत्व घेण्यासाठी खर्च केली. खरं म्हणजे इस्टेफॅनीयाचे आईवडील दोघंही वकील होते. दोघंही कोलंबियामध्ये वकिली करत होते. पण काही कारणांनी तिच्या वडिलांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांना भूमिगत व्हावं लागलं आणि अखेरीस मुलाबाळांसह देश सोडून पळून जावं लागलं. १० वर्षांची इस्टेफॅनीया, तिची दोन भावंडं आणि आईवडील असे पाच जण अमेरिकेच्या आश्रयाला आले. पण कुठल्याही देशात असा राजकीय आश्रय काही एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी खूप लांबलचक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, एवढं करून तुम्हाला राजकीय आश्रय मिळेल आणि त्या देशाचं नागरिकत्व मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे अमेरिकेत प्रत्यक्ष राजकीय आश्रय आणि नागरिकत्व मिळेपर्यंतचा काळ त्या कुटुंबासाठी अत्यंत तणावपूर्ण आणि अस्थिर होता.
मात्र इस्टेफॅनीयाच्या कुटुंबीयांचं नशीब चांगलं, की त्यांना अमेरिकेने नागरिकत्व दिलं आणि त्याहीपेक्षा इस्टेफॅनीयाचं नशीब चांगलं की तिला शाळेत फार चांगले शिक्षक भेटले. मायामीमधल्या तिच्या शाळेतील शिक्षकांनी तिच्या शिक्षणाकडे तर विशेष लक्ष दिलंच, पण त्याचबरोबर तिचा हा सगळा प्रवासही समजून घेतला, त्यात तिला जास्तीचे अडथळे आले ते समजून घेतले आणि तिला आवश्यक ती सगळी मदत केली. अमेरिकेत आल्यापासून आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी तिचे आईवडील सतत कामात असायचे. त्यांच्या वकिलीच्या डिग्रीचा अमेरिकेत काही उपयोग नव्हता. त्यामुळे आई मुलांची काळजी घेण्याबरोबरच दोन दोन नोकऱ्या करायची तर वडील अनेकदा रात्रपाळी करून जास्तीचे पैसे कमवायचे. त्यामुळे इस्टेफॅनीयाच्या शैक्षणिक आयुष्यावर तिच्या शिक्षकांचा खूप जास्त प्रभाव होता.
खरं म्हणजे तिला मोठं होऊन अभिनय करायचा होता. त्यासाठी ती घराबाहेर पडून एकविसाव्या वर्षी लॉस एंजेलिस इथे आलीही होती. मात्र ती एका मेक्सिकोच्या सीमारेषेजवळच्या तिजुआना या ठिकाणच्या निर्वासित छावणीमध्ये गेली आणि त्या क्षणापासून तिचं आयुष्य कायमसाठी बदलून गेलं. तिथल्या निर्वासित छावणीतल्या मुलांकडे बघून इस्टेफॅनीयाला स्वतःचं बालपण आठवलं. आणि तिच्या लक्षात आलं, की तिला निदान शाळेत गेल्यावर तरी चांगले शिक्षक लाभले होते, पण इथल्या मुलांना तर शाळाही नव्हती आणि शिक्षकही नव्हते. प्राथमिक शिक्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षांमध्ये ही मुलं शिक्षणापासून पूर्णतः वंचित राहिलेली होती. आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्या परिस्थितीला पूर्ण नाइलाज होता.
त्या निर्वासित छावणीतून परत आल्यावर इस्टेफॅनीयाने पुन्हा तिच्या करिअरचा विचार करून पाहिला. ती म्हणते, “विस्थापितांचं आयुष्य काय असतं याची मला पूण कल्पना आहे. मी तिथे जे दृश्य पाहिलं ते मी विसरूच शकत नव्हते. मला परत जावंच लागलं.”
इस्टेफॅनीया आणि काईल श्मिट या दोघांनी त्यांच्या बचतीतील १००० डॉलर्स (सुमारे ८ लाख रुपये) खर्च केले आणि त्यातून तंबू आणि शाळा सुरू करण्यासाठी लागणारं इतर साहित्य विकत घेतलं. ते त्या निर्वासित छावणीत गेले आणि शाळा सुरू होते आहे असं सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांच्याभोवती ५० मुलं गोळा झाली. या ५० मुलांना घेऊन इस्टेफॅनीयाच्या ‘येस वी कॅन फाउंडेशन’ची पहिली शाळा सुरू झाली.
काही दिवसांनी त्या निर्वासित छावणीतील लोकांना जरा पक्क्या निवाऱ्यात हलवलं गेलं, त्यावेळी या दोघांना त्या मुलांना पुढचं शिक्षण देण्याची इच्छा होती. पण आता ते शिक्षण सुरू कसं ठेवणार? इस्टेफॅनीया म्हणते, “आम्ही विचार केला, की आपण एखाद्या बसमध्ये शाळा सुरू केली तर? ती बसच घेऊन आपल्याला ठिकठिकाणी फिरता येईल.” त्यानंतर इस्टेफॅनीया आणि काईल या शाळा चालवण्यासाठी पहिली बस विकत घेतली. ऑनलाइन शोधलं की बसमधली शाळा कशी चालवतात.
आज येस वी कॅन फाउंडेशनने व्यावसायिक शिक्षक घेऊन तीन बसमधल्या आणि चार निर्वासित छावण्यांमध्ये शाळा सुरू केल्या आहेत. २०१९ सालापासून या १० देशांतील ३१०० मुलांना शिक्षण देण्यात आलं आहे.
येस, वी कॅन!
इस्टेफॅनीया म्हणते, “आम्ही करतो ते काम कायमस्वरूपी सुरू रहावं असं मला वाटतं. भविष्यात मागे वळून पाहताना आपण केलेल्या कामाबद्दल समाधान वाटलं पाहिजे. लोकांनी असं म्हटलं पाहिजे, की ज्यावेळी आम्हाला खरंच गरज होती त्यावेळी हे लोक तिथे होते.” तसं काम आता तिने सहकाऱ्यांसह सुरु केलं आहे. आणि त्यात यशही मिळत आहे.