Exams: ...अखेर दहावीचा तिढा सुटला, नववी आणि दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापनाचे धोरण जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 07:21 AM2021-05-29T07:21:55+5:302021-05-29T07:41:30+5:30
SSC Exams: शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली असून, शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धाेरण जाहीर केले आहे. त्यानुसार, दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हे मूल्यमापन धाेरण जाहीर केले.
शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत
आहे, त्याचाच आधार घेत यंदाचे दहावीचे मूल्यमापन
होईल. दहावीचा निकाल जूनअखेरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, तसेच या निकालाच्या अभिलेखांची पडताळणी विभागस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी करतील.
...तर परीक्षा देता येईल
ज्या नियमित विद्यार्थ्यांना निकाल समाधानकारक वाटणार नाही त्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेंतर्गत लगतच्या २ परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी मिळेल. शिवाय या सर्व प्रक्रियेसाठी शाळांना माहिती देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल.
असे आहे निकालाचे सूत्र
नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण तर गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जातील.
अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक
दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. १०० गुणांची ही सीईटी दोन तासांची असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. अकरावी प्रवेशात एकवाक्यता राहावी व व सर्वांना समान संधीसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांना असे मिळणार गुण
n पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी ते मंडळाच्या ज्या परीक्षांना बसले होते त्यापैकी उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेचे ८० पैकी प्राप्त गुणांच्या सरासरीएवढे गुण संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील, तर उर्वरित गुण अंतर्गत तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे देण्यात येतील.
n खासगी पुनर्परीक्षार्थींसाठी यापूर्वीच्या अंतिम इयत्तेत (५ वी ते ९ वी) प्राप्त एकूण गुणांची टक्केवारी लक्षात घेतली जाईल.
n खासगीरीत्या परीक्षेला बसणाऱ्यांच्या संपर्क केंद्रामार्फत घेतल्या गेलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, गृहकार्य, स्वाध्याय पुस्तिका, प्रकल्प यांचे ८० पैकी गुण देण्यात येतील, तर उर्वरित २० गुण अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असतील.