दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!; सम्यकच्या जिद्दीची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 08:55 PM2022-05-31T20:55:49+5:302022-05-31T20:56:19+5:30

दिल्लीच्या सम्यक जैनने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच UPSC मध्ये टॉप १० मध्ये सातवा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.

eyesight lost yet mother made son topper of upsc secured 7th rank | दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!; सम्यकच्या जिद्दीची कहाणी...

दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!; सम्यकच्या जिद्दीची कहाणी...

googlenewsNext

नवी दिल्ली-

दिल्लीच्या सम्यक जैनने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच UPSC मध्ये टॉप १० मध्ये सातवा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. सम्यकला दृष्टीहिन आहे, पण टॉप १० मध्ये येऊन त्याने लाखो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवून दिला आहे. देशाच्या सर्वात मोठ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा त्यांच्या तयारीचा विचार करणाऱ्या अशा सर्व लोकांना सम्यकनं दाखवून दिलं की कठोर परिश्रम, समर्पण आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीनं काहीही साध्य करता येतं.

"दोन वर्षांपूर्वी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मार्च २०२० मध्ये तयारी सुरू केली आणि त्याचवर्षी परीक्षा देखील दिली होती. पण यश मिळू शकलं नव्हतं. पहिला प्रयत्न माझ्यासाठी एक चाचणी होती. यूपीएससी परीक्षेत कोणती आव्हानं आणि अडचणी येतात हे मला पाहायचं होतं", असं सम्यक म्हणाला. या यशाचं श्रेय सम्यकनं आई-वडिलांना दिलं. विशेषतः आई वंदना जैन यांचा त्यानं आवर्जुन उल्लेख केला. वंदना जैन स्वत: एअर इंडियामध्ये काम करत आहेत पण त्यांनी व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सम्यकला पाठिंबा दिला आणि आपल्या मुलाला टॉपर बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

आई आणि मुलाचं नातं कसं अभेद्य असतं याचं दर्शनच सम्यकच्या यशातून दिसून आलं आहे. "माझा आणि सम्यकचा एकमेकांशी चांगला संवाद होताच. सम्यक जेव्हा बोलायचा ते मी लिहून काढायचे. यासाठी आम्ही खूप सरावही केला", असं सम्यकच्या आई वंदना जैन यांनी सांगितलं. सम्यक जे बोलायचा ते नीट समजून घेऊन ते लिहायचं काम वंदना जैन यांनी केलं. 

अनुवांशिक रोगामुळे सम्यकची दृष्टी कमी झाली
वयाच्या १८ व्या वर्षी सम्यकची दृष्टी गेली तेव्हा त्याच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. सम्यकने सांगितलं की, 'मी 18 वर्षांचा होतो तेव्हा असं आढळून आलं की मला एक अनुवांशिक आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. यामध्ये समस्या वाढतच जाते. आता मी दृष्टिहीन आहे. मला वाचता येत नाही आणि लिहिता येत नाही म्हणून मला तोंडी सांगावं लागतं आणि माझी आई ते लिहून काढायची"

UPSC शिवाय दुसरा कोणता चांगला मार्ग नाही
सम्यकचा जन्म दिल्लीत झाला. वयाच्या १३व्या वर्षापर्यंत दिल्लीत वास्तव्य केलं. त्याचं शालेय शिक्षण शाहदरा, दिल्ली येथं झालं. त्यानंतर एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या वडिलांची मुंबईत बदली झाली आणि तेथून सम्यकनं दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू केला पण काही कारणांमुळे त्याला सोडावं लागलं आणि नंतर सम्यक दिल्लीला आला. त्यानं दिल्ली विद्यापीठात BA इंग्लिश ऑनर्स केलं. त्यानंतर पुन्हा आयआयएमसी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून इंग्रजी पत्रकारितेचा कोर्स केला आणि तेथून पुन्हा जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. तिथं सम्यकनं आंतरराष्ट्रीय संबंधांचं शिक्षण घेतलं. जेएनयूमध्ये शिकत असताना सम्यकला यूपीएससीसाठीची प्रेरणा मिळाली आणि त्याने तयारी सुरू केली. पत्रकारितेदरम्यान देश जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप चांगली संधी मिळाल्याचं सम्यक म्हणतो. देशासाठी आणि देशाची परिस्थिती बदलण्यासाठी UPSC पेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही असं सम्यकला वाटतं.

आई-वडिलांनी केली सर्वाधिक मदत
सम्यकच्या म्हणण्यानुसार त्याला त्याच्या आई-वडिलांकडून जास्त मदत मिळाली. सम्यकला डिजिटल स्वरूपातील पुस्तकांची गरज असल्यानं सर्व ती उपलब्ध होतील याची काळजी आईनं घेतली होती. तर त्याच्या मित्रांनीही मदत केली. मार्गदर्शन केलं, नोट्स दिल्या आणि सर्वतोपरी मदत केली. चर्चा आणि वादविवादातही मदत केली. सम्यक दिवसातून सुमारे ७ तास अभ्यास करायचा, त्यात तो ब्रेकही घेत असे. सम्यक म्हणतो की त्याला या निकालाची कधीच अपेक्षा नव्हती. आपलं नाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे यादीत यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना होती. परीक्षेचा निकाल लागल्यापासून फोन वाजणं थांबलेलं नाही, लोकांचे सारखे फोन येत आहेत, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, असंही सम्यकनं सांगितलं. 

Web Title: eyesight lost yet mother made son topper of upsc secured 7th rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.