पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:12 AM2021-07-21T11:12:16+5:302021-07-21T11:14:41+5:30
कोरोनाच्या नियमांचं पालन करून पार पडणार परीक्षा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली होती. मात्र,कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटींच्या अधीन राहून येत्या ८ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करता येईल, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रखडलेली शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनामुळे २३ मे रोजी घेतली जाणार होती. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. मात्र,कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सर्व साधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करता. परंतु, यंदा कोरोनामुळे ही संख्या चांगलीच घटली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ६ लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यात इयत्ता पाचवीच्या ३ लाख ८६ हजार ३२८ तर इयत्ता आठवीच्या २ लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.