Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 05:08 PM2021-05-10T17:08:18+5:302021-05-10T17:11:45+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षाही रद्द करण्याची करण्यात आली होती मागणी. तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारखा घोषित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीपरीक्षा २३ मे २०२१ रोजी पार पडणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात येत असताना ही परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण विद्यर्थी पालकांमध्ये होतं. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.
"कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल," असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल. pic.twitter.com/maaDpyJgFm
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) May 10, 2021
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दर वर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी फेब्रुवारी दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा २३ मे रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ३७ जिल्ह्यांतील ७६१ परीक्षा केंद्रावर ही आठवीसाठी ही परीक्षा होणार होती. तसेच परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र ही परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करण्यात आली होती. इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार होती.
परीक्षा रद्दची मागणी
इयत्ता दहावीची परीक्षा राज्य शिक्षण मंडळानं, तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाने रद्द केल्या आहेत. याचबरोबर जेईई, नीटच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीए, सीएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील जवळपास १ लाख विदयार्थ्यांनी केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे, तेथे पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, शिपाई यांची नेमणूक करणे यांची नेमणूक करणे योग्य नाही. राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही परीक्षा रद्दची मागणी केली होती. यामुळे विद्यार्थी आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सगळ्यांच्याच सुरक्षित आरोग्याला हानी पोहचू शकते अशी भीती व्यक्त होत होती.