विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! कोणतीच परीक्षा 'नीट' नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 05:41 AM2024-06-28T05:41:20+5:302024-06-28T05:41:32+5:30

सध्या कोणत्याही परीक्षा ‘नीट’ होत नाहीत हे कटू सत्य स्वीकारावेच लागेल.

future of students in the dark! No exam is perfect | विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! कोणतीच परीक्षा 'नीट' नाही

विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! कोणतीच परीक्षा 'नीट' नाही

सध्या कोणत्याही परीक्षा ‘नीट’ होत नाहीत हे कटू सत्य स्वीकारावेच लागेल. तलाठी भरती, शिक्षक भरती, पोलिस भरती, विद्यापीठ आणि इतर सर्व परीक्षा पेपरफुटीच्या भ्रष्टाचारी विळख्यात घट्ट अडकल्या आहेत. ४७५० केंद्रांवरून २४ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविणारी नीट युजी २०२४ ही वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा गैरव्यवहारांमुळे गाजते आहे. 

चाळीस चाळीस लाख घेऊन पेपरफुटी केलेल्या या परीक्षेत १५६३ विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची खिरापत वाटली गेली आणि कधी नव्हे ते ६७ विद्यार्थ्यांवर पैकीच्या पैकी म्हणजे ७२० मार्कांची मुक्त हस्ते उधळण केली गेली! असा अभूतपूर्व, संतापजनक प्रकार, शिक्षणाचा बट्ट्याबोळ, काळाबाजार राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या देखरेखीखाली झाला हे विशेष! 

लाखभर जागांसाठी २४ लाख विद्यार्थी ! काय हा जीवघेणा प्रकार! आतातरी डॉक्टरकीच्या ध्यासाने पछाडलेल्या पालकांनी, नातेवाइकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यांचा गांभीर्याने विचार करावा! मुलांवर अवास्तव अपेक्षा लादून, ऊर फुटेपर्यंत अभ्यास करायला लावून त्यांचं आयुष्य, स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. शिक्षणाचे इतर पर्याय स्वीकारण्याची मुभा मुलांना दिली तर त्यांच्यावरील ताण आपोआप कमी होईल! प्रवेश परीक्षा तयारीच्या खाजगी संस्थांचे तर पेव फुटले आहे. कोटा येथे दरवर्षी २० ते २५ विद्यार्थी तणावाखाली, अपेक्षांचे ओझे असह्य होऊन आत्महत्या करतात. अशी जिवावर बेतणारी कुटुंबे उद्ध्वस्त करणारी, समाजस्वास्थ्य बिघडवणारी आणि विश्वासार्हता गमावून बसलेली शिक्षण पद्धत तपासून बघितलीच पाहिजे. 

घरच्यांच्या अवास्तव दबावामुळे मुलं जिवानिशी जातात. जनरेट्यामुळे पेपरफुटीची कबुली केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना द्यावी लागली, यातच सरकारची हतबलता दिसून येते. भ्रष्टाचाराला चटावलेली यंत्रणा समूळ उखडून टाकत नाही तोपर्यंत डॉक्टरकीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ असाच सुरू राहील. म्हणूनच वैद्यकीय शिक्षणाचा दुराग्रह सोडून मुलांना इतर क्षेत्रांतील झेपणारे शिक्षण देणे जास्त संयुक्तिक आणि शहाणपणाचे ठरेल. त्याकडे विद्यार्थी, पालक, समाज सगळ्यांनीच डोळसपणे पाहायला हवे. - हेमंतकुमार मेस्त्री, मनोर

Web Title: future of students in the dark! No exam is perfect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.