FYJC class 11th Admission Process: अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:02 PM2021-05-28T14:02:53+5:302021-05-28T14:11:13+5:30
FYJC class 11th Admission Process: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार?
FYJC class 11th Admission Process: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित झाला होता. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी १० वीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्यूला जाहीर केला. यासोबतच इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचंही जाहीर केलं.
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे.
CET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे. परीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
इयत्ता ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील (CET) गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.