Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 03:50 PM2021-05-11T15:50:59+5:302021-05-11T15:52:46+5:30
Ranjitsinh Disale: ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वार्के फाऊंडेशनने एक पुरस्कार सुरू असून, हॉलिवूडमधील अभिनेते अॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह २०२० मधील ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. (global teacher prize winner ranjitsinh disale joined new global student prize academy)
चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे. अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे. अभिनेते अॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत.
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीत स्कॉलरशिप
समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान
विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असते. आपण त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले आणि त्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले, तर ते जग पादाक्रांत करू शकतील. त्यांच्या कथांवर झोत टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी जागतिक विद्यार्थी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान असून अशा प्रेरणादायक उद्देशाला माझा पाठिंबा आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा दिशेने एक पाऊल असल्याची अशी प्रतिक्रिया ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी रणजितसिंह डिसले यांनी या निवडीनंतर दिली आहे.
सोलापूरचे डिसले गुरुजी, चित्रकार धोत्रे यांचा पर्यटन विभागातर्फे गौरव
रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील स्कॉलरशिप
काही दिवसांपूर्वी भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.