१२वी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन! शुक्रवारपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 07:37 IST2025-01-11T07:36:40+5:302025-01-11T07:37:26+5:30
‘पेड’ स्टेटस प्राप्त झालेलेच हॉल तिकीट उपलब्ध होणार

१२वी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन! शुक्रवारपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारपासून उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट पाहावे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी करावी. ज्या आवेदनपत्रांना ‘पेड’ असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट ‘पेड स्टेटस एडमिट कार्ड’ या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. तसेच फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का, स्वाक्षरी असावी, अशा सूचनाही राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.