शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:32 AM2020-07-28T11:32:14+5:302020-07-28T11:35:06+5:30
तिगरीच्या झोपडपट्टी राहणाऱ्या परमेश्वरसाठी भूक ही सर्वसामान्य बाब आहे, कधीकधी परमेश्वर भुकेने व्याकूळ झालेला असतानाही त्याने जिद्द सोडली नाही.
नवी दिल्ली – शहरातील एका झोपडपट्टीत छोट्या खोलीत ९ जणांसोबत राहणाऱ्या परमेश्वरची संघर्ष कहाणी ऐकूण तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल, १७ वर्षीय परमेश्वरने प्रचंड मेहनत आणि जिद्दीने सीबीएसईच्या १२ परीक्षेत तब्बल ९१.७० टक्के गुण मिळवले आहेत. परमेश्वरच्या या यशाने कठीण परिस्थितीतून लढण्याची नवी उमेद इतर विद्यार्थ्यांना दिली आहे.
तिगरीच्या झोपडपट्टी राहणाऱ्या परमेश्वरसाठी भूक ही सर्वसामान्य बाब आहे, कधीकधी परमेश्वर भुकेने व्याकूळ झालेला असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. परमेश्वरने दहावीपासूनच खानापूर येथे कार धुण्याचं काम सुरु केले होते, त्यासाठी महिन्याला त्याला ३ हजार रुपये कमाई होत होती, या पैशातून तो शिक्षण आणि पुस्तकांचा खर्च भागवत होता. कडाक्याच्या थंडीतही परमेश्वर पहाटे ४ वाजता उठून पायपीट करत कामाच्या ठिकाणी पोहचत होता. त्यासाठी अडीच तास तो १०-१५ कार धुण्याचं काम करायचा. आठवड्यातून सहा दिवस परमेश्वर हे काम करत होता.
या यशाबाबत परमेश्वर म्हणतो की, माझ्यासाठी थंडीत उठणं, काम करणे सोप्प नव्हतं. कडाक्याच्या थंडीत थंड पाण्यात हात घालणं खूप कठीण होते, माझे हात सुन्न व्हायचे. १०० रुपयांसाठी अनेकदा मला अपमानही सहन करावा लागत होता. तरीही शिक्षणासाठी मी काम करत होतो. शिक्षण घेण्यासाठी मला कमाई करणे गरजेचे होते. माझे ६२ वर्षीय वडिलांना ह्दयविकाराचे रुग्ण आहेत, भावाच्या नोकरीवर कुटुंबाची देखभाल होऊ शकत नाही. मी कुटुंबावर ओझं बनून राहू शकत नव्हतो असं तो म्हणाला.
इतकचं काय तर परमेश्वरच्या आयुष्यात अनेक संघर्षाचे प्रसंग आले, मार्च महिन्यात वडिलांची सर्जरी करण्यात आली, परमेश्वरचे वडील रुग्णालयात उपचार घेत होते, तर परमेश्वर हिंदीच्या पेपरची तयारी करत होता, या संघर्षात एका सामाजिक संस्थेने परमेश्वरची मदत केली, परमेश्वरला पेपरची उजळणी आणि दिल्ली विश्वविद्यालयातील इंग्रजी ऑनर्स पाठ्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केली. भविष्यात परमेश्वरला शिक्षक बनायचं आहे, मला इतकं ज्ञान घ्यायचं आहे की मी दुसऱ्यांची मदत करु शकेन, अनेक मुलं अशी आहेत ज्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत असं परमेश्वरने सांगितले.