आरोग्याचे धडे आता ब्रेल लिपीतही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 09:28 AM2022-08-01T09:28:12+5:302022-08-01T09:28:35+5:30
कोरोनाच्या काळानंतर अनेक नागरिक आरोग्य साक्षर झाले आहेत. आरोग्यविषयक उपलब्ध साहित्य वाचनातही वाढ झाल्याची नोंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजारांची लक्षणे काय, त्यावर उपाय कोणते, मूलभूत आजारांची सद्य:स्थिती काय, या सगळ्या गोष्टींची माहिती दृष्टिहीन व्यक्तींना त्यांच्या भाषेत वाचता यावी, याकरिता सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या साहाय्याने नाशिकच्या ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने आरोग्याचे ज्ञान असणारे ‘आरोग्य संजीवनी’ हे पुस्तक ब्रेल लिपीमध्ये काढले आहे. त्यामुळे राज्यातील दृष्टिहीन व्यक्तींना फायदा होणार आहे.
कोरोनाच्या काळानंतर अनेक नागरिक आरोग्य साक्षर झाले आहेत. आरोग्यविषयक उपलब्ध साहित्य वाचनातही वाढ झाल्याची नोंद आहे. त्यासाठी काही जण वेबसाइट्सचा आधार घेत आहेत. मात्र, दृष्टिहीन व्यक्तींना आरोग्याबाबत जनजागृती करणारे साहित्य, माहिती ब्रेल लिपीत उपलब्ध नव्हते. त्याकरिता नाशिकच्या या संस्थेने पुढाकार घेतला आहे. राज्यात सुमारे ३० हजार दृष्टिहीन व्यक्ती ब्रेल लिपीचा वापर करून वाचन करत आहेत.
पुस्तकात २५४ पाने असून, यामध्ये मूलभूत आरोग्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाची किंमत ८०० रुपये असेल.
सुरुवातीला ५०० पुस्तकांची पहिली आवृत्ती काढण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात त्याचे प्रकाशन मुंबईत करण्यात येणार आहे. या पुस्तकांचा दृष्टिहीन व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील माहिती दृष्टिहीन व्यक्तींना वाचता यावी, त्यांना त्याचे ज्ञान उपलब्ध व्हावे याकरिता सायन हॉस्पिटलच्या सहकार्याने हे पुस्तक लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. ब्रेल लिपी वाचणाऱ्यांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. राज्यात ७५ दृष्टिहीन व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्था असून, त्यात शाळांचाही समावेश आहे. अशा संस्थांना हे पुस्तक मोफत देण्यात येईल. तसेच राज्यातील महापालिकांनीही ही पुस्तके विकत घेऊन दृष्टिहिनांसाठी उपलब्ध करून द्यायला हवी.
- अरुण भारस्कर, अध्यक्ष, ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन
आमच्याकडे आम्ही रुग्णांना आजाराची माहिती व्हावी, या हेतूने आरोग्य मार्गदर्शिका नावाचे एक पुस्तक तयार केले होते. त्यामध्ये सायन हॉस्पिटलमधील ३० डॉक्टरांचा सहभाग असून, त्यांनी आरोग्याच्या विविध विषयांवर त्यांचे लिखाण या पुस्तकांसाठी केले आहे. नाशिकच्या संस्थेने आम्हाला संपर्क करून त्यांना ही माहिती दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेलमध्ये उपलब्ध करून देण्याची इच्छा दर्शविली. त्याप्रमाणे ते पुस्तक तयार झाले असून, लवकरच त्याचे प्रकाशन केले जाईल.
- मोहन जोशी,
अधिष्ठाता, सायन हॉस्पिटल