मुलांना पैशाची किंमत कशी कळेल? त्यासाठी काय करायचं? जाणून घ्या मोलाचे सल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:21 AM2022-03-23T05:21:57+5:302022-03-23T05:22:15+5:30
एखाद्या गोष्टीपासून मुलांना वंचित ठेवलं, तर त्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं आणि चुकीच्या मार्गानं त्या गोष्टींकडे मुलं वळतात, त्यामुळे पालकांनीच योग्य ती समज देऊन त्यांच्यावरची अनावश्यक बंधनं उठवली, तर साधनांचा योग्य मार्गानं वापर करतात, हे आता सिद्ध झालं आहे.
मुलांना पॉकेट मनी द्यावा का, याबाबत पूर्वी बरेच पालक साशंक असायचे आणि मुलांना नको त्या वयात पैशांची सवय लावू नये, असं त्यांचं मत होतं.. काहीअंशी हे खरं असलं, तरी मुलांना ‘योग्य’ तेवढा पॉकेटमनी द्यायला हवा, असं आता तज्ज्ञांचं मत आहे.
एखाद्या गोष्टीपासून मुलांना वंचित ठेवलं, तर त्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं आणि चुकीच्या मार्गानं त्या गोष्टींकडे मुलं वळतात, त्यामुळे पालकांनीच योग्य ती समज देऊन त्यांच्यावरची अनावश्यक बंधनं उठवली, तर साधनांचा योग्य मार्गानं वापर करतात, हे आता सिद्ध झालं आहे. पैशांची गोष्टही त्याला अपवाद नाही. यासंदर्भात काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?..
१) पैशांचं नियोजन
मुलांना जर आपल्या मार्गदर्शनाखाली पैशांचा योग्य वापर करायला शिकवलं, पैशासंदर्भात छोटे-छोटे निर्णय त्यांना घेऊ दिले, तर मुलं पैशांचं उत्तम नियोजन करतात आणि पैशांची ‘किंमत’ही त्यांना कळते, असा तज्ज्ञांचा अनुभव आहे.
२) कर्जाच्या विळख्यापासून मुक्त
मुलांना लहानपणापासून पैशांबाबत ‘आत्मनिर्भर’ बनवलं, पैशांची जबाबदारी घ्यायला शिकवलं, तर मोठेपणी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता कमी होते.
३) आज, आता... नाही !
आज, आता, ताबडतोब... कोणतीही गोष्ट लगेच पाहिजे, असा अनेकांचा कल असतो. आजूबाजूला पाहिल्यावर मुलांनाही अशा गोष्टींची चटक लागू शकते, पण पैशांचा योग्य वापर त्यांना शिकवला, त्यासाठी ‘पैशाची मालकी’ (अर्थातच मर्यादित प्रमाणात) त्यांच्यावर सोपवली, तर ‘आज, आत्ता...’ या हव्यासापासून मुलं स्वत:ला वाचवू शकतात आणि नंतर मिळालेलं म्हणजेच ‘विलंबित समाधान’ किती मोठं असतं, याची जाणीव त्यांना होते.
४) उद्दिष्ट व साध्य याची पूर्तता
कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि पैसा कितीही कमी असला, तरी त्याला ‘किंमत’ असते. तसेच योग्य मार्गाने साठवत नेल्यास तो वाढीस लागतो आणि त्याची ‘किंमत’ही वाढते, याची जाणीव मुलांना पॉकेटमनीमुळे होते. आपल्या प्राथमिकता मुलांना कळतात आणि आपली मध्यम आणि दीर्घकालीन ध्येयंही त्यांना त्यामुळे गाठता येतात.