महाराष्ट्रातली पोरं किती हुशार, होणार चाचपणी; विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:03 PM2022-06-17T13:03:29+5:302022-06-17T13:03:56+5:30
कोविडकाळात शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान हे केवळ शिक्षकांसाठीच नाही तर शिक्षण विभागासाठीही मोठे आव्हान आहे.
मुंबई :
कोविडकाळात शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान हे केवळ शिक्षकांसाठीच नाही तर शिक्षण विभागासाठीही मोठे आव्हान आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांच्या नियमित शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासाआधी त्यांची मागील शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचे आकलन क्षमता किती व कसे झाले आहे याची नोंद शिक्षण विभागाकडून सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पूर्व चाचण्यांद्वारे घेण्यात येणार आहे. थोडक्यात महाराष्ट्रातली मुले किती हुशार याचीच यानिमित्ताने चाचपणी होणार आहे. नंतर मग ३० दिवसांच्या पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाच्या व कृतिपत्रिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक उजळणी घेण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत मराठी माध्यमाचा सेतू अभ्यासक्रम शिक्षकांना संकेस्थस्थळावर उपलब्ध झाला असला तरी इंग्रजी व उर्दू माध्यमाचा अभ्यासक्रम रात्री उशिरापर्यंत अपलोड झाला नसल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
कोविडकाळात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असले तरी त्यांचा थेट संपर्क शिक्षकांशी येत नसल्याने मूळ संकल्पना, अभ्यास, संज्ञा समजून घेण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे दिसून आले. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयाचा पाया कच्चा राहिल्याने त्यांना पुढील शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यात अडचणी येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे एससीईआरटीच्या माध्यमातून ३० दिवसांचा सेतू अभ्यासक्रम राज्यातील शाळांना इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृतिपत्रिका शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात आणि सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शिवाय यानंतर त्या-त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
चाचण्यांसाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या सेतू अभ्यासक्रमाच्या लिंक्स शिक्षकांना प्राप्त न झाल्याने काही शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सेतू अभ्यासक्रम प्राप्त झाल्यानंतर किमान चाचणीसाठी काही आवश्यक कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी काही शिक्षक या निमित्ताने करू लागले आहेत.
पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी
कार्यवाही राज्यातील शाळा विदर्भातील शाळा
पूर्व चाचणी - १७ ते १८ जून २०२२ १ ते २ जुलै २०२२
३० दि.सेतू अभ्यासक्रम २० जून ते २३ जुलै ४ जुलै ते ६ ऑगस्ट
उत्तर चाचणी - २५ ते २६ जुलै ८ ते १० ऑगस्ट