शाळांची वेळ पूर्ववत न ठेवल्यास छंदांना वेळ कसा द्यायचा? मुलांच्या पुरेशा झोपेची जबाबदारी पालकांची
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:06 AM2024-02-29T07:06:49+5:302024-02-29T07:06:59+5:30
सध्या विद्यार्थी शाळेतून आले की खेळाचा सराव करतात. कला, छंद वर्ग व काहीजण अतिरिक्त शिकवणीसाठी जातात.
- प्रशांत बिडवे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्व प्राथमिक ते इयत्ता चाैथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवल्यास पर्यायाने अनेक शाळांत माध्यमिक वर्ग उशिरा भरवावे लागतील. त्यामुळे कला, क्रीडा यासह छंदांना वेळ कसा द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे प्राथमिक वर्ग भरण्याची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवावी, अशी मागणी पालक, मुख्याध्यापक व वाहतूक संघटनांकडून हाेत आहे.
सध्या विद्यार्थी शाळेतून आले की खेळाचा सराव करतात. कला, छंद वर्ग व काहीजण अतिरिक्त शिकवणीसाठी जातात. शाळेची वेळ बदलल्यास यासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांवर प्रयाेग करण्याऐवजी शाळांची वेळ पूर्ववत ठेवावी, मुलांना पुरेशी झाेप मिळण्याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. माध्यमिकचे वर्ग सकाळी आणि प्राथमिक वर्गाची शाळा दुपारी भरवणे हा पर्याय उत्तम ठरू शकताे, असेही काही पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
अशी घ्या मुलांच्या झाेपेची काळजी
मुलांचा माेबाइल, टीव्हीवरचा वेळ कमी करण्यासाठी पालकांनी त्याचा वापर कमी करावा. पालकांनी दिनक्रम निश्चित करून मुलांना पुरेशी झाेप मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
- डाॅ. हमीद दाभाेलकर, मानसाेपचार तज्ज्ञ
अनेकदा पालक घरापासून दूर शाळांत प्रवेश घेतात. त्यामुळेही मुलांची धावपळ होते. शाळेचे शुल्क भरून जबाबदारी संपत नाही, तर त्यांनी मुलांची झाेप, सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शाळांची पूर्वीची वेळच कायम ठेवली पाहिजे.
- दिलीप सिंह विश्वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंटस असाेसिएशन
शिक्षण विभागाने घाईत शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय लादण्यापेक्षा शहर-ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न तसेच पालकांची मते जाणून घ्यावीत आणि त्यानुसार शाळेची वेळ बदलली पाहिजे.
- मुकुंद किर्दत, समन्वयक, आप पालक युनियन