चार महिन्यांत कसा पूर्ण हाेणार अकरावीचा अभ्यास?; शिक्षक, पालक, विद्यार्थी संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 02:40 AM2020-11-29T02:40:50+5:302020-11-29T07:17:49+5:30
नियोजन कसे करणार?; मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शैक्षणिक प्रक्रिया अकरावीसह सर्वच शैक्षणिक प्रक्रिया थांबविण्यात आल्या हाेत्या.
मुंबई : अखेर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे, मात्र शैक्षणिक वर्ष संपायला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक असल्याने अभ्यासक्रमाचे नियोजन कसे असणार? बारावीचा अभ्यासक्रम व वर्ष केव्हा सुरू होणार? ४ महिन्यांत बारावीचा पाया असणाऱ्या अकरावी अभ्यासक्रमाचे मूल्यमापन कसे करणार, या साऱ्यांविषयी अनेक प्रश्न कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक तसेच पालक, विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शैक्षणिक प्रक्रिया अकरावीसह सर्वच शैक्षणिक प्रक्रिया थांबविण्यात आल्या हाेत्या. मात्र एसईबीसी आरक्षण वगळून सर्व प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून जारी झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया संपून महाविद्यालये सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी उलटण्याची शक्यता
आहे. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षासाठी अवघे काहीच महिने विद्यार्थी, शिक्षकांच्या हातात असतील. एवढ्या कमी कालावधीत वर्षभराचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. तर यासाठी शिक्षण विभागाकडून काहीच नियोजन का नाही, असा
प्रश्न काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला. तसेच हे नियाेजन जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली.
पूर्वतयारी करणे गरजेचे; शिक्षकांचे मत
प्रवेशाला होत असलेल्या विलंबाची माहिती शिक्षण विभागाला असतानाही त्यांनी यासंबंधी नियोजन, मूल्यमापन कसे असेल, अभ्यासक्रम काय व कसा शिकवणार याची पूर्वतयारी करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया अद्याप अकरावीत प्रवेश न झालेल्या सुमित खांडेकरच्या वडिलांनी दिली. शिक्षण विभागाने आता तरी या विद्यार्थ्यांचे अकरावी व बारावीच्या शैक्षणिक वर्षाच्या बाबतीत नियोजन करावे, असे मत शिक्षकही व्यक्त करत आहेत.