शेकडो भारतीय विद्यार्थ्यांचे कॅनडातील उच्च शिक्षण धोक्यात, थेट पंतप्रधानांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:20 PM2021-08-02T13:20:49+5:302021-08-02T13:21:24+5:30
Education News: २१ ऑगस्टपर्यंत भारतातून येण्यासाठीची विमानसेवा बंद केल्याने पालक-विद्यार्थी चिंतातुर
मुंबई : कॅनडा सरकारने २१ ऑगस्टपर्यंत भारतातून येण्यासाठीची विमानसेवा बंद केल्याने कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाऊ पाहणारे शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. आमचे शैक्षणिक वर्ष वाचवा, असे आर्जव या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले आहे.
मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता, पुण्यासह अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा कॅनडामध्ये शिक्षण घेण्याकडे ओढा वाढला आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांनी तेथे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. बहुतेक अभ्यासक्रमांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना तेथे पोहोचणे अत्यावश्यक आहे. मात्र आता कॅनडा सरकारने भारतासाठीची विमानसेवा २१ ऑगस्टपर्यंत बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. ही विमानसेवा तत्काळ सुरू व्हावी याकरिता आता पालक, विद्यार्थी एकवटले असून त्यांनी त्यासाठी मोहीम उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कॅनडासाठीची विमानसेवा सुरू करण्याची विनंती त्यांनी ई-मेलद्वारे केली आहे. पंतप्रधानांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये, आपण कृपया कॅनडाच्या पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय करावा, असे साकडेही त्यांनी घातले आहे.
कॅनडासाठीची विमानसेवाच बंद असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत. ज्यांना तो मिळाला आहे ते देखील २१ ऑगस्टपर्यंत अडकले आहेत. नंतरही विमानसेवा सुरू होईल की, नाही याबाबत अनिश्चितता आहे. शिवाय ते पालकांना घेऊन जाऊ शकत नाहीत. कारण त्यांना व्हिसा मिळत नाही.
अन्य देशातून कॅनडाला जाणे एक पर्याय आहे. बहुतेक सर्व विद्यार्थी हे अठरा-एकोणीस वर्षांचे आहेत. अन्य देशातून एकट्याने पोहोचणे आणि हे करताना कोरोना संदर्भातील तेथील नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी दिव्य बनले आहे. कॅनडामध्ये भारतातील कोरोना चाचणी अहवाल स्वीकारला जात नाही. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना इतर देशातून कॅनडात पोहोचायचे तर आधी जवळचे स्थान म्हणून दोहा (कतार) येथे जाऊन तेथे तीन चार दिवस मुक्काम करावा लागेल. तेथे आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल आणि मग निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर कॅनडाला जाता येईल. एकूण खर्चातही मोठी वाढ होणार आहे. शिवाय त्यांना पालकांना सोबत नेता येणार नाही. चिंतातुर पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आता व्हॉट्सॲप ग्रुप बनवले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ते प्रचंड पाठपुरावा करत आहेत.
उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रयत्नाने कॅनडामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून प्रवेश घेतला. मात्र आता त्याबाबत सगळीच अनिश्चितता आहे. कॅनडासाठीची विमानसेवा सुरू झाली नाही तर पालक आणि विद्यार्थ्यांच्या आशांवर पाणी फिरले जाईल.
- सुनीत कोठारी, एक चिंताग्रस्त पालक