28 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा मार्ग निवडला; पहिल्याच प्रयत्नात झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:30 PM2023-10-11T17:30:20+5:302023-10-11T17:32:27+5:30
कुठल्याही कोचिंगशिवाय अभ्यास करुन मिळवले मोठे यश.
IAS Ayush Goel Success Story: भरगच्च पगाराची नोकरी आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु असे काही लोक आहेत, जे पूर्णपणे वेगळा मार्ग निवडतात. असे अनेक लोक आहेत, ज्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या आवडीचे काम सुरू केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत, ज्याने 28 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी केली आणि त्यात यश मिळवले.
आम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव IAS आयुष गोयल आहे. आयुषने दिल्लीतील सरकारी शाळातून शिक्षण घेतले. यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली. पदवीनंतर आयुषने कॅट परीक्षेत यश मिळवले आणि केरळमधील आयआयएम कोझिकोड येथे एमबीएसाठी प्रवेश घेतला. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी जेपी मॉर्गन कंपनीमध्ये अॅनालिस्ट म्हणून काम सुरू केले. आयुषला या पदावर काम करत असताना 28 लाख रुपये वार्षिक पगार होता.
आयुषचे वडील सुभाष चंद्र गोयल किराणा मालाचे दुकान चालवतात, तर आई मीरा गोयल गृहिणी आहेत. आयुषला नोकरी लागल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला होता. पण, आयुषने नोकरी सोडून UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना धक्का बसला. एवढी चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर त्याच्यावर अभ्यासाचे खूप दडपण होते. यूपीएससी परीक्षेसाठी तो रात्रंदिवस अभ्यास करू लागला.
आयुषने यूपीएससीसाठी दीड वर्ष घरीच अभ्यास केला. यासाठी त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. इंटरनेटवर व्हिडिओ पाहून, पुस्तके वाचून तो दररोज आठ ते दहा तास सतत अभ्यास करू लागला. त्याच्या अभ्यासाचे चीज झाले आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. पहिल्याच प्रयत्नात आयुषने देशातून 171 वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झाला.