अमेरिकेत शिकायला जायचंय मग विद्यार्थ्यांना व्हिसा हवाय, पैसे किती भरायचे...?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:20 AM2023-07-10T06:20:22+5:302023-07-10T06:21:03+5:30
लोकमत व US काउन्सलेटच्या सहकार्याने उपक्रम, व्हिसा अर्ज भरतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे व्हिसा मुलाखतीसाठी जाते वेळी तुम्ही शुल्क भरल्याचा पुरावा सोबत बाळगणे गरजेचे आहे.
प्रश्न - माझ्या विद्यार्थी व्हिसा अर्जासाठी मी किती शुल्क भरणे गरजेचे आहे?
उत्तर - विद्यार्थी व्हिसाच्या अर्जदारांना दोन प्रकारचे शुल्क भरावे लागते. एका व्हिसा अर्जासाठी (१८५ अमेरिकी डॉलर) आणि दुसरे SEVIS (३५० अमेरिकी डॉलर). तुमची अर्ज प्रक्रिया आणि अपॉइंटमेंट यासाठी अमेरिकी सरकार याखेरीज अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. I-901 SEVIS या शुल्कामुळे अमेरिकी सरकारला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे, तसेच विद्यार्थी जिथे उच्चशिक्षण घेत आहेत, तेथील माहिती ऑनलाइन पद्धतीने राखण्यास मदत होते.
प्रश्न -SEVIS शुल्क मी कधी भरायचे असते ?
उत्तर - अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठात तुम्ही शिक्षण घेणार आहात याचा निर्णय झाला की तसेच, तुमचा आय-२० फॉर्म आला की तुम्ही व्हिसा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करून ऑनलाइन व्हिसा (डीए-१६०) अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आणि मग SEVIS शुल्क www.fmjfee.com इथे भरता येते.
प्रश्न - व्हिसा मुलाखतीपूर्वी SEVIS शुल्क मी भरणे गरजेचे आहे का?
उत्तर - व्हिसा अर्ज भरतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे व्हिसा मुलाखतीसाठी जाते वेळी तुम्ही शुल्क भरल्याचा पुरावा सोबत बाळगणे गरजेचे आहे. जर तुम्ही SEVIS शुल्क भरलेले नसेल, तर काउन्सिलर अधिकारी तुमचा व्हिसा अर्ज नाकारू शकतो. या नकारानंतरही तुम्ही SEVIS शुल्क भरू शकता. मात्र, तुमच्या व्हिसा अर्जाच्या शेवटच्या प्रक्रियेला यामुळे विलंब होईल. SEVIS शुल्कासोबतच काउन्सिल अधिकारी तुमचा आय-२० फॉर्म, तुमचा पासपोर्ट आणि डीएस-१६० देखील तपासणीसाठी मागू शकतो, हे लक्षात ठेवा.
प्रश्न - माझा व्हिसा येण्याअगोदर मी अन्य एखाद्या विद्यापीठामध्ये माझे SEVIS शुल्क भरू शकतो का?
उत्तर - तुमचा SEVIS क्रमांक हा विशिष्ट विद्यापीठाशी लिंक असतो. जर तुम्ही शुल्क भरल्यानंतर आणि तुमचा व्हिसा येण्याच्या अगोदर विद्यापीठ बदलण्याचा निर्णय घेतलात, तर तुम्हाला नवा SEVIS क्रमांक देण्यात येईल. त्याकरिता नव्याने शुल्क भरण्याची गरज नाही.
प्रश्न - SEVIS शुल्कासाठी असलेल्या प्रश्नांसाठी मला कुठे संपर्क करता येईल?
उत्तर - विद्यार्थी व्हिसाची प्रक्रिया गोंधळाची असू शकते, याची आम्हाला कल्पना आहे; पण जेव्हा शंका निर्माण होईल त्यावेळी निश्चित केलेल्या शालेय अधिकाऱ्याला किंवा डेसिग्नेटेड स्कूल ऑफिसरला तुम्ही SEVIS शुल्क किंवा आय-२० संदर्भात प्रश्न विचारू शकता. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश आणि व्हिसा प्रक्रियेत मदत करण्यासाठी विद्यापीठातर्फे डेसिग्नेटेड स्कूल ऑफिसरची नेमणूक केली जाते. यासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती https://studyinthestates.dhs.gov/ या संकेतस्थळावर प्राप्त होऊ शकते.