बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:56 IST2025-01-11T10:55:20+5:302025-01-11T10:56:32+5:30
मान्यता मिळताच स्वयंम प्लॅटफॉर्मवर शिकता येणार

बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशात लॉजिस्टिक क्षेत्रात येत्या पाच वर्षांत नव्याने एक ते दीड कोटी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने आयआयएम-मुंबईने स्वयंम प्लॅटफॉर्मसाठी नव्याने सात अभ्यासक्रमांचा आराखडा तयार केला आहे. त्यांना मान्यता मिळताच, तो देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्याचा आयआयएमचा मानस आहे.
मुंबईत नव्याने सुरू झालेल्या आयआयएम - मुंबईने बदलत्या काळाची गरज ओळखून अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून संस्थेने ‘डिजिटल सप्लाय चेन’ हा अभ्यासक्रम स्वयंम प्लॅटफॉर्मसाठी यापूर्वीच तयार करून लागू केला आहे. आता संस्थेने नव्याने सात अभ्यासक्रम आराखडे तयार करून ते केंद्रीय उच्चशिक्षण मंत्रालयाकडे पाठविले आहेत.
नवे अभ्यासक्रम
nवेअरहाउस ऑटोमेशन
nएआय/एमएल इन पोर्ट मॅनेजमेंट
nसप्लाय चेन डिजिटायझेशन
nरोल ऑफ ब्लॉक चेन अँड सप्लाय ट्रान्सफॉर्मेशन
nई- कॉमर्स सप्लाय चेन
nसायबर सिक्युरिटी इन सप्लाय चेन
nडिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इन सप्लाय चेन मॅनेजमेंट
‘गती शक्ती’अंतर्गत ३५ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क
केंद्राच्या गती शक्ती प्रकल्पांतर्गत देशात ३५ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहेत. म्हणूनच आयआयएम - मुंबईने हेल्थकेअर लॉजिस्टिक, पोर्ट मॅनेजमेंट, एअरकार्गो मॅनेजमेंट आदी १४ अभ्यासक्रम सुरू केले आहेत, तसेच काही विषयांचा अभ्यासक्रम आराखडा तयार करून तो अन्य संस्थांना दिला आहे.
आयआयएम - मुंबईचे काही अभ्यासक्रम १५ तासांचे, तर काही अभ्यासक्रम ३० तासांचे आहेत. नामांकित कंपन्यांही हे अभ्यासक्रम राबवित आहेत, तसेच कंपन्यांतील कर्मचारीही त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.