ऑनलाइन अभ्यासाने बिघडले हस्ताक्षर; विद्यार्थ्यांच्या लिखाण गतीलाही लागला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 11:31 PM2021-03-27T23:31:32+5:302021-03-27T23:32:05+5:30
सवयींत झाले बदल, शाळा नसली तरी ऑनलाईन शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करताना सुवाच्च अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा.
स्नेहा पावसकर
ठाणे : गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष शाळा नसल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली, अभ्यासाची पद्धत, अनेक सवयींत बदल झाले. असाच झालेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे वर्षभर प्रत्यक्ष शाळा न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले तर काहींच्या लेखनगतीलाही ब्रेक लागला आहे. थोडेसे लिखाण केले तरी हात दुखतो, कंटाळा आला अशा मुलांच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.
कोरोनामुळे ठाणे, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वर्षभर जोर होता तो ऑनलाईन शाळेवरच. ऑनलाईन शाळेला अनेक मर्यादा होत्या. प्रत्यक्ष शाळेतील अभ्यास आणि ऑनलाईन अभ्यास यात फरक होता. शाळेत तासिकांप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. दिवसभर शाळेत विद्यार्थ्यांचे बरेच लिखाण होत असते. मात्र या मर्यादित वेळेच्या ऑनलाईन शाळेत लेखनात फार वेळ घालवला जात नाही, परिणामी लेखनाची सवय तुटल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात खूप बदल झाला आहे. हस्ताक्षर बिघडले आहे, अनेकांची अक्षरे वाचताही येत नाही. तसेच ऑनलाईन शाळेतही विद्यार्थ्यांना काही मुद्दे लिहायला सांगितलेच तरीही त्यांचे हस्ताक्षर कसे येते याकडे कोणीही लक्ष देत नाही.
विद्यार्थ्यांनी हे करावे
- शाळा नसली तरी ऑनलाईन शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करताना सुवाच्च अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा.
- उत्तम हस्ताक्षरात लिहिलेले वाचायला कोणालाही आवडते, त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर दोन ते तीनवेळा लिहावे, जेणेकरून ते उत्तर पाठ होते आणि हस्ताक्षरही सुधारण्यास मदत होते.
- एखादा पाठ किंवा त्याचा काही भाग घरातील मोठ्या व्यक्तीस वाचण्यास सांगावा आणि आपण तो भराभर मात्र चांगल्या अक्षरात लिहावा, जेणेकरून लेखनाची गतीही चांगली राहिल. हा असा प्रयत्न आठवड्यातून एकदोन वेळा करणे तर सहज शक्य आहे.
ऑनलाईन शाळेदरम्यान विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे कल दिसतो. अभ्यासातील लिखाणाचा भागही महत्त्वाचा असून तो घेतला जातो. मात्र विद्यार्थ्यांना स्वताला समजेल इतके व्यवस्थित लिहावे असा शिक्षक आधीच सल्ला देतात. मात्र यात सवय हा महत्त्वाचा भाग आहे. रोज शाळेत ६-७ तासिकांपैकी ३-४ तासिकांमध्ये हमखास लेखन व्हायचे. नेहमीची सवय झाल्याने अक्षराला वळण राहायचे आणि मूळात लिखाणाची गती हा सवयीचा भाग आहे. परंतु आता दररोज लेखन सक्तीचे नसल्याने मुलांचे हस्ताक्षर बिघडले व गतीही कमी झालेली आहे, असे मत काही मराठी भाषातज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोनाने मुलांचे सर्वच प्रकारे नुकसान केले आहे. प्रत्यक्ष शाळा, अभ्यास नसल्याने मुले आळशी झाली आहेत. लेखनाचा अभ्यास पूर्ण करायला घेतला तरी त्यातील हस्ताक्षर सुंदर आणि सुवाच्च काढण्याचा ते प्रयत्न करत नाहीत.
- दिपेश येंडेराव, पालक