छतावरचे पंखे, सोपे गळफास आणि तरुणांच्या आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 07:08 AM2021-12-20T07:08:59+5:302021-12-20T07:09:34+5:30

शाळा-कॉलेजेस ही दुकाने आणि विद्यार्थी त्यातील उत्पादने नव्हेत, हे मान्य न करता होस्टेलमधल्या छतांचे सर्व पंखे काढून काय साधणार आहे?

increased cases of youth suicides and remove roof fans in hostel | छतावरचे पंखे, सोपे गळफास आणि तरुणांच्या आत्महत्या!

छतावरचे पंखे, सोपे गळफास आणि तरुणांच्या आत्महत्या!

googlenewsNext

मैत्रेयी कुलकर्णी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू ह्या आपल्या देशातील अग्रगण्य संस्थेने विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्यांच्या प्रमाणाला रोखण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून होस्टेलच्या खोल्यांमधील छतांवरील पंखे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता टेबलवर ठेवण्यासाठीचे पंखे वापरण्यात येतील. गेल्या वर्षभरात संस्थेतल्या चार विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन जीव दिल्याची पार्श्वभूमी या निर्णयामागे आहे. गेली दोन वर्षे सर्वांच्याच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खडतर होती हे खरे पण, तरुणांच्या आत्महत्या हा प्रश्न सततच ऐरणीवर असतो. प्रश्नाच्या मुळापर्यंत जायचे नाही असे व्यवस्थेनेच ठरवले तर, पाणी वरवरच्या बांधाला वारंवार टकरा देत राहाणार तर, कधी बांध फोडूनच पलीकडे पोचू पाहाणार. मानसिक आरोग्य - ताणतणाव ते मानसिक संकट हा पूर्ण पट पार करुन जीव देण्याच्या निर्णयाप्रत पोहोचणारे हे विद्यार्थी मदतीचा कुठलाही हात गवसू न देणाऱ्या परिस्थितीचे बळी  असतात !

ताणतणावाची अनेक कारणे हे व्यवस्थांमधून निर्माण झालेल्या अपेक्षांचे फलित असते. अपेक्षांचा तोल सांभाळण्याची ताकद व्यक्तीगणिकच नाही तर, काळ, स्थिती, परिस्थितीसापेक्ष बदलती असते. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तीमध्ये हा समतोल ढळणाऱ्या लक्षणांची तीव्रता किती आणि व्यापकता किती यावरच तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या मदतीची दिशा ठरवावी लागेल. मानसिक त्रास ही कुणी जाणूनबुजून केलेली निवड नव्हे हे, ध्यानी घ्यावे लागेल.

पंखे हटवणे म्हणजे त्या त्रासाची जबाबदारी पूर्णपणे बळी पडलेल्या व्यक्तीवरच टाकून मोकळे होणेच नव्हे तर, त्या व्यक्तीच्या निर्णय क्षमतेचा अधिकारही काढून घेण्यासारखे आहे. आपल्या मनावर काम करण्यासाठी दोन प्रकारच्या मदतींची गरज भासते: व्यक्तीची सक्षमता वाढवणे आणि  मनोबल पोखरत जाणाऱ्या व्यवस्थेत सुधारणा करणे ! स्वत्व, आरोग्य आणि प्रश्न सोडवण्याची कौशल्ये या गोष्टींमध्ये बाह्य मदतीने आत्यंतिक फरक पडू शकतो. प्रश्नांकडे आव्हाने म्हणून बघता येऊ शकते, त्या आव्हानांना भिडण्याची ताकद वाढवता येऊ लागते,  जबाबदारी पेलणाऱ्या पायांतली ताकद वाढवता येऊ शकते ! जोखमी कमी करण्यासाठीचा रस्ता सोबत चालण्याचे काम मदतनीस, समुपदेशक करत असतो. मानसिक ताणात व त्रासात ही मदत  निकडीची आहे, ती सर्वांनाच उपलब्ध असावी. व्यवस्था ओळखू आली तर, ती बदलता येऊ शकेल पण, बदलाची शक्यताच नाकारायची ठरवली तर, तसे ठामपणे मानून बसलेल्या व्यक्ती आणि व्यवस्थेत काही फरकच रहात नाही.

विद्यार्थ्यांचे प्रश्न अद्याप धुक्यामागेच राहिले आहेत. अभ्यासातील स्पर्धा, अध्यापनशास्त्रातील तऱ्हा, त्यांना असलेले-नसलेले निवडीचे स्वातंत्र्य आणि परीक्षा पद्धती ही तर सुरुवात असते केवळ !  तरुण वयात  असलेले  विविध ताण, त्या वयामध्ये शरीर-संप्रेरके, मन, नातेसंबंध, जबाबदाऱ्या यांत होत चाललेले बदल ह्या सगळ्याची जाणीव व तळाशी गेलेले मनाचे अनेक प्रश्न वर काढण्यास कारणीभूत ठरतात. 
आपल्या कुटुंबात-समाजात स्पष्ट संवादाचा अभाव दिसून येतो, स्वातंत्र्याचा वापर किती व जबाबदारीची उचल किती हा, प्रश्न अनुत्तरितच राहातो, आपल्याच आयुष्याचे व्यवस्थापन आपण कसे करायला घेतले आहे याचे भान वारंवार सोडायला लावणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येते. बऱ्याचदा जो अभ्यास करायला घेतला त्यामागची कारणे किंवा त्याबद्दलची वास्तविकता तपासलेली नसते. त्यासाठीची फी, कधी राहण्याचा खर्च, वर्ष-वेळ असे सर्व गेल्यावर त्याचे ओझे वाटू लागते. आपले ध्येय अवास्तव होते किंवा प्रयत्नांची दिशा  चुकली हा धडा घेण्यासाठी मन तयार झालेले नसते. मग, अस्वस्थता टोकाला जाऊ लागल्यावर अंगावर पान पडले तर, आभाळ पडले म्हणून भिणारे ससे बनून धावत सुटायला होते. 

विद्यार्थ्यांचे प्रश्न धुक्यामागून बाहेर काढता आले तर, वास्तविकता, आकडेवारी ह्या डोळ्यासमोर धरल्यानेही मदत होऊ शकते. पण, कारणांपर्यंत न जाता केवळ परिणामांवर काम करायचे तर, त्याने कारणे बदलणारच नाहीत. ‘जगावेसे वाटत नाही’ असे म्हणणारे अनेकजण जगावेसे वाटण्याच्या शक्यता पडताळू पाहातात. तो धागा पक्का करत जाता येतो. ‘थ्री इडियट्स’ मध्ये रांचो आपल्या मित्रांना सांगतो, आपल्या छातीवर हात ठेवून फक्त म्हणा, ‘ऑल इज वेल’. त्याच्या एका मित्राची अस्वस्थता मनाची अशी निव्वळ समजूत काढून संपत नाही. पण, व्यवस्थेने छतावरचे पंखे काढून ‘ऑल इज वेल’ म्हणायचे ठरवले तर, ते निश्चितच पुरेसे ठरणार नाही. - आपली शाळा-कॉलेजे ही दुकाने आणि विद्यार्थी त्यातील उत्पादने नव्हेत याची जाणीव ठेवावी लागेल.
 

Web Title: increased cases of youth suicides and remove roof fans in hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.