2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5.5 कोटी थेट नोकऱ्या अन् 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 09:16 PM2024-11-28T21:16:17+5:302024-11-28T21:17:02+5:30
एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
India cooperatives:भारताच्या सहकार क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत 5.5 कोटी थेट नोकऱ्या आणि 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, भारताची सहकार प्रणाली जागतिक स्तरावरील 30 लाख सहकारी संस्थांपैकी 30% चे प्रतिनिधित्व करते.
मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म प्राइमस पार्टनर्सने आपल्या अहवालात म्हटले की, भारत 2030 पर्यंत 50 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीत सहकार क्षेत्र हे आशेचे आणि संभाव्यतेचे किरण आहे. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या सहकारी प्रणालींपैकी एक असलेला भारत, आर्थिक वाढ, सामाजिक समता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी या क्षेत्राच्या अफाट क्षमतेचा लाभ घेण्यासाठी तयार आहे.
अहवालानुसार, भविष्याकडे पाहता 2030 पर्यंत सहकारी संस्थांमध्ये 5.5 कोटी प्रत्यक्ष रोजगार आणि 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे रोजगार निर्माते म्हणून त्यांची भूमिका आणखी वाढेल. सकल देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) त्याचा प्रभाव तितकाच प्रभावशाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. 2030 पर्यंत त्यांचे संभाव्य योगदान 3 ते 5% असू शकते. जर आपण प्रत्यक्ष आणि स्वयंरोजगार, या दोन्हींबद्दल बोललो तर ते 10% पेक्षा जास्त असू शकते.