भारत शिकवणार श्रीलंकेच्या ४० लाख मुलांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 08:37 AM2023-03-20T08:37:27+5:302023-03-20T08:37:45+5:30

चीननं श्रीलंकेला लालूच दाखवताना त्यांना मोठं कर्ज तर दिलं, पण सावकारी दरानं ते वसूलही केलं.

India will teach 4 million children of Sri Lanka... | भारत शिकवणार श्रीलंकेच्या ४० लाख मुलांना...

भारत शिकवणार श्रीलंकेच्या ४० लाख मुलांना...

googlenewsNext

आपल्याला स्वास्थ्य हवे असेल, शांतता हवी असेल आणि शिवाय गरजेच्या वेळी मदत हवी असेल, तर आपल्या शेजाऱ्यांशी आपलं नातं चांगलंच असायला हवं. काहीवेळा आपला शेजारी आखडू असतो, त्याला आपल्याविषयी आकस वाटत असू शकतो, क्वचित काहीवेळा तो आपल्याला पाण्यातही पाहात असतो, तरीही शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्याला स्वत:पासूनच करावी लागते. शेजाऱ्यापेक्षा आपली स्थिती कितीही चांगली असली, तरीही एकमेकांशी असलेले सलोख्याचे संबंध शेवटी दोघांच्याही हिताचे असतात. भारतानंही याबाबत नेहेमीच शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची काळजी घेतली आहे.‘थोरला भाऊ’ म्हणून त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांना वेळोवेळी मदतही केली आहे. अगदी पाकिस्तानपासून कोणताही देश याला अपवाद नाही.

ज्यांनी या मोठ्या भावाशी पंगा घेऊन इतरांशी संग करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याचे दुष्परिणामही भोगावे लागले आहेत. त्याचेच ताजे उदाहरण आहे श्रीलंका. भारताशी जवळीक सोडून त्यांनी चीनशी दोस्ताना करण्याचा प्रयत्न केला. याच नव्या दोस्ताने त्यांना अक्षरश : तोंडावर आपटताना भीकेला लावलं आणि न घरका न घाटका अशा दरिद्री अवस्थेत आणून सोडलं. तरीही भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत करणं सोडलं नाही. श्रीलंकेचे डोळे आता उघडले असून भारतानं त्यांना वेळोवेळी जी मदत केली, करीत आहे, त्या आधारावरच हा देश संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे. 

कुठूनही फारशी मदत मिळत नसताना भारतानं श्रीलंकेला जी मदत केली, त्या मदतीच्या माध्यमातूनच आता श्रीलंकेतील तब्बल ४० लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. भिकेला लागलेल्या आणि दोन वेळच्या जेवणालाही महाग झालेल्या श्रीलंकेला भारतानं गेल्यावर्षी तब्बल एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत केली होती. याच पैशांतील सुमारे एक कोटी डॉलर्सचा उपयोग करून श्रीलंका आपल्या देशातील सुमारे निम्म्या म्हणजे ४० लाख विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची छपाई करणार आहे.  

गाळात बुडालेल्या या शेजाऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी भारत यापुढील काळातही श्रीलंकेला मदत करणार आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्रे आणि या मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी याबाबत भारताचं ऋण व्यक्त करताना म्हटलं आहे, भारत आमचा सच्चा मित्र आहे. आमच्या कठीण काळात भारत कायमच आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. आताही आम्ही त्याचं प्रत्यंतर घेत आहोत. त्याचवेळी चीननं मात्र श्रीलंकेचं सारं लोणी ओरबाडून खाऊन झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. 

चीननं श्रीलंकेला लालूच दाखवताना त्यांना मोठं कर्ज तर दिलं, पण सावकारी दरानं ते वसूलही केलं. चीनकडून घेतलेल्या कर्जाचं साधं व्याजही आपण फेडू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर श्रीलंकेला आपलं हंबनटोटा हे बेट चीनला ९९ वर्षांच्या करारानं लीजवर देऊन टाकावं लागलं. श्रीलंकेच्या अध : पतनाची ही सुरुवात होती. त्यानंतर श्रीलंका अशा तऱ्हेनं गाळात रुतत गेला की, त्यातून बाहेर निघणं या देशाला अशक्य झालं. 

याच काळात ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणांतर्गत भारतानं श्रीलंकेला वारेमाप मदत केली. भारतानं श्रीलंकेला आतापर्यंत ३२ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. तीही अतिशय अल्प व्याजदरानं. याच मदतीच्या जोरावर श्रीलंका आता आपल्याला सावरू पाहतो आहे. 
आपल्या देशातील मुलांना, तरुणांना शिक्षण मिळालं नाही, तर भविष्यातही आपल्या देशाची काहीच पत उरणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भारतानं केलेल्या मदतीचा उपयोग श्रीलंका प्राधान्यानं शिक्षणावर खर्च करतो आहे. याच माध्यमातून श्रीलंका आता भारतातून स्वस्त दरात प्रिंटिंग पेपर आणि त्याच्याशी निगडित साहित्य खरेदी करणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची आणि इतर शैक्षणिक गरजांची पूर्तता होऊ शकेल. भारतानं केलेल्या मदतीतूनच श्रीलंका जीवनावश्यक वस्तू, अन्न, औषध, पेट्रोल, डिझेल, रेल्वे, ऊर्जा इत्यादींसाठी खर्च करीत आहे.

Web Title: India will teach 4 million children of Sri Lanka...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.