ब्रिटनमध्ये ‘फॉरेस्ट स्कूल’चा अभिनव पर्याय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:51 AM2021-11-04T08:51:28+5:302021-11-04T08:51:35+5:30
मुलांना तंत्रज्ञानाची ओळखच होऊ नये किंवा त्यापासून त्यांनी दूरच राहावं, असा या शाळांचा दृष्टिकोन अजिबातच नाही, पण, नको त्या वयात मोबाइलसारख्या वस्तू हाती लागून आणि त्याच्या आहारी जाऊन त्यांचं बालपण बरबाद होऊ नये हा या शाळांचा प्रमुख हेतू आहे.
तंत्रज्ञानाचं महत्त्व आज किती आहे आणि त्यावर लोकांचं आयुष्य किती प्रमाणावर अवलंबून आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. मोबाइलचंच उदाहरण घ्या. मोबाइलचे जसे दुष्परिणाम आहेत, तसे त्याचे अनेक फायदेही आहेत. पण, लहान मुलं आणि तरुण पिढी नेमकी मोबाइलच्या नकारात्मक बाजूंकडेच आकर्षिली जात आहे. पालकांनाही त्यामुळे आपल्या पाल्यांची मोठी चिंता लागली आहे. मुलांचं मोबाइलचं व्यसन कसं सोडवावं या प्रश्नानं तर जगभरातील पालक चिंतेत आहेत, परंतु या प्रश्नाचं ना उत्तर त्यांना मिळालंय, ना या प्रश्नातून त्यांची सुटका झालीय, पण, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या गॅजेट्सच्या नादी लागून नवी पिढी वास्तवाचं आणि वास्तव जगाचं भानच विसरायला लागलीय. त्यात त्यांची शारीरिक, मानसिक क्षमता कमी होतेय. नाती दुरावायला लागलीत. प्रत्यक्षातलं जग आणि आभासी जग या बाबतीतला त्यांचा गुंता वाढायला लागलाय. प्रत्यक्षातील मित्र-मैत्रिणींपेक्षा सोशल मीडियावरील दोस्तांमध्ये ते अधिक रमायला लागलेत..
मुलांना या गॅजेट्सपासून दूर करण्याचा जगभरातील पालकांचा प्रयत्न सपशेल फसल्यामुळे आता ब्रिटनमधील पालकांनी नवा पर्याय शोधून काढला आहे आणि ते हा पर्याय तपासून पाहताहेत. काय आहे हा पर्याय?
आपल्या मुलांच्या हाती मोबाइल लागूच नये किंवा त्यांच्या शरीर-मनावर परिणाम करणाऱ्या तंत्रज्ञानापासून त्यांना लहानपणापासूनच दूर कसं ठेवता येईल, निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची नैसर्गिक वाढ कशी होईल याचा प्रयत्न आता ब्रिटनमधल्या पालकांनी सुरू केला आहे. त्यासाठी आपल्या पाल्यांना लहानपणापासून ‘नेचर फॉरेस्ट स्कूल’मध्ये दाखल करायला त्यांनी सुरुवात केली आहे. मुलांची नैसर्गिक वाढ कशी होईल, मोबाइलसारख्या गोष्टींपासून ते दूर कसे राहतील, किंबहुना या गोष्टींपेक्षाही अधिक चांगल्या गोष्टी निसर्गात आहेत, त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, हे या शाळांमध्ये प्रामुख्यानं शिकवलं जातं.
मुलांना तंत्रज्ञानाची ओळखच होऊ नये किंवा त्यापासून त्यांनी दूरच राहावं, असा या शाळांचा दृष्टिकोन अजिबातच नाही, पण, नको त्या वयात मोबाइलसारख्या वस्तू हाती लागून आणि त्याच्या आहारी जाऊन त्यांचं बालपण बरबाद होऊ नये हा या शाळांचा प्रमुख हेतू आहे. कोरोनाकाळानंतर आणि ‘होम स्कूलिंग’ला कंटाळलेल्या अनेक पालकांनी आता या शाळांचा आधार घेतला आहे. हजारो मुलं या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. ब्रिटनमधील ‘फॉरेस्ट स्कूल असोसिएशन’च्या (एफएसए) मते, नैसर्गिक वातावरणात मुलांची वाढ व्हावी, लहानपणापासूनच त्यांना सामना कराव्या लागणाऱ्या ताण-तणावापासून त्यांची मुक्ती व्हावी, यासाठी पालक या शाळांना पसंती देत आहेत. कोरोनाच्या कडक नियमावलीमुळे मुलंही घरात अडकून पडली होती. ही मुलं एकटेपणाचा शिकार होत होती. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी या शाळांचा खूप उपयोग होत आहे.
‘फॉरेस्ट स्कूल असोसिएशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, ‘नेचर फॉरेस्ट स्कूल’मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी यापूर्वी कधीही इतकी गर्दी झाली नव्हती. सर्वसामान्य अनुभवांपासून मुलांना वंचित राहावे लागू नये यासाठी देशांतील इतर सर्वसामान्य शाळांमध्येही आता ‘नेचर सेशन्स’ सुरू झाले आहेत. या कालावधीत मुलांना मुद्दाम निसर्गाच्या सान्निध्यात नेले जाते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मुलांच्या केवळ आकलनातच नाही तर, त्यांच्या वर्तणुकीतही अतिशय प्रभावी बदल झाला आहे. जे लोक ग्रामीण भागात राहातात, त्यांना निसर्गाचं महत्त्व आधीपासूनच माहीत होतं, आहे, पण, शहरी पालकांचा ओढा आता या शाळांकडे वाढतो आहे.
‘ब्राइटवूड ट्रेनिंग’चे विकी स्टुवर्ट तर म्हणतात, कोरोनानं अनेकांच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडवून आणली आहे. काेरोना काळात अनेकांना विचार करायला, चांगल्या-वाईटातलं तारतम्य समजून घ्यायला वेळ मिळाला. त्याचाच परिणाम म्हणून फॉरेस्ट स्कूलकडे लोक आकर्षित होत आहेत. या शाळांनी ‘लपाछपी’, ‘आंधळी कोशिंबीर’.. यासारख्या ‘जुनाट’ वाटणाऱ्या अनेक खेळांनाही पुनरुज्जीवन दिलं आहे. मुलं त्याचा भरभरून आनंद घेताना दिसत आहेत.
गॅजेट्स आहेत; पण, घातक नाही!
केंट नेचर स्कूलनेही आपल्या विद्यार्थ्यांना असे अनेक कल्पक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या शाळेतील मुलं ‘घातक’ टेक्नॉलॉजीपासून दूर आहेत, पण, या गोष्टी त्यांना माहीतच नाहीत असं नाही. या शाळेच्या संचालक एन्ना बेल सांगतात, मुलांना फक्त काही गोष्टींची ओळख करून द्यावी लागते. त्यानंतर त्यांच्या कल्पनेला आपोआप पंख फुटतात. इथली अनेक मुलं लाकडाच्या टीव्हीची कल्पना मांडतात, झाडाच्या फांद्यांपासून तयार केलेला रिमोट त्यांच्या कल्पनेत असतो. इथेही अनेक ‘गॅजेट्स’ आहेतच, पण, त्यातलं एकही मुलांसाठी घातक नाही.. म्हणूनच आजही आमच्या शाळेत आताही दोनशे मुलं वेटिंग लिस्टवर आहेत..