एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प; एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:46 AM2020-06-08T10:46:40+5:302020-06-08T10:46:53+5:30
इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे एकात्मिक स्वरुपात तीन स्वतंत्र भागामध्ये पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार वर्षभर केवळ तीन पुस्तके विद्यार्थ्यांना राहणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प प्रयोगीक तत्वावर चिखली तालुक्यात राबविणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्या इयत्तेला जेवढे पाठ्यपुस्तके असतील तेवढे एकत्र करण्यात आले असून, त्याचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पहिल्या तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या भागात पुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे.
तिसºया भागात त्यापुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. त्यानुसार एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेमध्ये नेण्याची आवश्यकता नाही. प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणाºया या प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातून चिखली तालुक्याची निवड करण्यात आली आहे. चिखली तालुक्यात २७२ शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास पहिली ते सातवीपर्यंतचे २३ हजार ४२४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पाच दिवसात मिळतील एमात्मिक पुस्तके
एकात्मिक प्रकल्पांतर्गत दिली जाणारी पुस्तकेही येत्या पाच दिवसात उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या दरवर्षीप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीचे मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ठिकाणी तीन पुस्तकांचा उपक्रम आहे, त्याठिकाणी समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिली जणारी मोफत पाठ्यपुस्तके वितरीत होणार नाहीत.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्यामध्ये वर्षभर फक्त तीन पुस्तके व त्यात सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे मुलांना सर्व पुस्तके शाळेत आणण्याची गरज राहणार नाही. यासाठी चिखली तालुक्याची निवड केली असून या आठवड्यात पुस्तके उपलब्ध होतील.
- एजाज खान,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.