BMC शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक अभ्यासक्रम; केंब्रिज विद्यापीठाबरोबर करार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:33 PM2021-09-08T20:33:06+5:302021-09-08T20:33:56+5:30
महापालिका आपल्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांसारख्या इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे.
मुंबई - महापालिका पब्लिक स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात सहमतीचा करार बुधवारी झाला. देशात आणि जगातील सर्वोत्तम पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
मुंबई पब्लिक स्कुलमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मोफत अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. शासनाच्या अतिथीगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, केम्ब्रिज दक्षिण आशियाचे विभागीय संचालक महेश श्रीवास्तव, शिक्षण तज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ, केम्ब्रिज विद्यापीठ प्रेस प्रमुख अजय प्रताप सिंग, शिक्षणधिकारी ( प्रभारी) राजू तडवी यावेळी उपस्थित होते.
महापालिका आपल्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांसारख्या इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे. या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे विद्यमान शैक्षणिक वर्षात चार हजार विद्यार्थी संख्येसाठी दहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धत अनुसरावी लागली हे या शाळांचे यश असल्याचा गौरव आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच केंब्रिज हे जगातील दर्जेदार शिक्षणाचे माध्यम असल्याने मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दोन महिन्यांत निर्णय
किती शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकतो याचा येत्या दोन महिन्यांत अभ्यास करून पुढील शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.