विद्यार्थी, पालकांना दिलासा! शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे झाले शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:57 AM2021-06-18T07:57:20+5:302021-06-18T07:57:35+5:30
शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :आता एाका शाळेतून दुसऱ्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला नववी, दहावीत प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय (टीसी) मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या आधीच्या संबंधित शैक्षणिक संस्थेने शाळा सोडल्याचा दाखला(टीसी) देण्यास अडवणूक केली किंवा दिला नाही तरी विद्यार्थ्याला वयानुसार दुसऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळेल.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या या निर्णयामुळे ज्यांनी लॉकडाऊन काळात आर्थिक स्थिती खालावल्याने खासगी संस्थांमधून अनुदानित किंवा शासकीय संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, अशा विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळेल.
शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशावेळी हे विद्यार्थी शाळाबाह्य होतात आणि शिक्षण प्रवाहापासून दूर फेकले जातात. केवळ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रवेश नाकारणे हे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र उशिरा दिले जात असेल व त्यामुळे प्रवेश नाकारला असेल, अशांना नवीन शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जारी केला. विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य मानावे, असे निर्णयात नमूद आहे.
...अन्यथा शाळा, मुख्याध्यापकांवर कारवाई!
प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवण्यात येइल. ज्या शैक्षणिक संस्था किंवा शाळा विद्यार्थ्यांना टीसीशिवाय प्रवेश नाकारेल किंवा प्रवेश नाकारल्याने एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर अशा शाळेवर आणि तेथील मुख्याध्यापकांवर कडक कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.