आयटीआय विद्यार्थ्यांचा देशात वाजला डंका; चौघांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:23 AM2022-09-15T06:23:29+5:302022-09-15T06:23:40+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्था या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवून देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात.

ITI students All four were felicitated by the Prime Minister Narendra Modi | आयटीआय विद्यार्थ्यांचा देशात वाजला डंका; चौघांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

आयटीआय विद्यार्थ्यांचा देशात वाजला डंका; चौघांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

googlenewsNext

मुंबई : कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मान प्राप्त व्हावा, या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यंदापासून आयटीआय विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पहिल्याच वर्षी या निमित्ताने महाराष्ट्रातील ४ विद्यार्थ्यांची पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या गौरवासाठी निवड झाली आहे. निवड झालेले चारही विद्यार्थी विदर्भातील असून यामध्ये दोन विद्यार्थी तर दोन विद्यार्थिंनीचा समावेश आहे. दोन विद्यार्थी यवतमाळ, १ विद्यार्थी गडचिरोली आणि १ नागपुरातील आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवून देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या अनुषंगाने यंदापासून विश्वकर्मादिनी देशातील आयटीआयमधील उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ साजरा होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या ट्रेडमधून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यासंबंधित प्रमाणपत्रही मिळणार आहे. देशपातळीसोबत राज्य पातळीवरही प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ होणार आहे. 

१७ सप्टेंबरला समारंभ 
निवड झालेल्या विद्यार्थ्यांत यवतमाळमधील दोघांचा समावेश आहे.  करण चव्हाण आणि लीना वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. करण चव्हाणने वायरमन या ट्रेडमध्ये ६०० पैकी ५९४ गुण प्राप्त केले असून लीनीने इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ५९४ गुण मिळवले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण आदिवासी संस्थेतील सुशील हेडाऊ याने मेकॅनिक डिझेल ट्रेडमध्ये ५९४ गुण तर नागपूर संस्थेतील श्रुती नरसुलवार या विद्यार्थिनीने एअरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या अभ्यासक्रमात ५५५ गुण मिळवले आहेत. या चारही विद्यार्थ्यांचा १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे

आयटीआय विद्यार्थ्यांना ही पारंपरिक पदवीदान सोहळ्याप्रमाणे दीक्षांत समारंभात सन्मानपूर्वक अभ्यासक्रम पूर्ततेचे प्रमाणपत्र दिले जाणार ही महत्त्वाची बाब आहे. यामुळे आयटीआय अभ्यासक्रमाला ही इतर अभ्यासक्रमाप्रमाणेच महत्त्व असल्याचे अधोरेखित होऊन भविष्यात विद्यार्थ्यांचा कल आणखी वाढेल ही अपेक्षा आहे - दिगंबर दळवी, संचालक, औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

Web Title: ITI students All four were felicitated by the Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.