सोप्पं तर असतं ते...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:41 AM2020-07-06T03:41:44+5:302020-07-06T03:42:49+5:30
- गौरी पटवर्धन शाळेच्या बाबतीत काहीतरी निरोप आल्याचं ऐकल्यावर सिद्धीचा चेहरा पडला. आजोबा म्हणाले, ‘तुमची शाळा हळूहळू सुरू करायचा ...
- गौरी पटवर्धन
शाळेच्या बाबतीत काहीतरी निरोप आल्याचं ऐकल्यावर सिद्धीचा चेहरा पडला. आजोबा म्हणाले, ‘तुमची शाळा हळूहळू सुरू करायचा प्लॅन आहे. बाकीच्या बऱ्याच शाळा सुरू झाल्या आहेत.’
‘हो, ते तर मलापण माहिती आहे.’- सिद्धीला अजिबात ती आयडिया आवडलेली नव्हती; पण कधी ना कधी शाळा सुरू होणार हे तिलाही माहिती होतं. म्हणजे पुन्हा न आवडणा-या विषयांचा अभ्यास करायचा. तिला ते विषय आवडायचे नाहीत, त्यामुळे तिचं वर्गात लक्ष नसायचं. त्यामुळे ती वर्गात कधीच उत्तरं द्यायची नाही. शिक्षक तिचं कौतुक करायचे नाहीत. त्यामुळे तिला अजूनच शाळेत जावंसं वाटायचं नाही. हे सगळं गेलं एक वर्ष बिनसत होतं. त्यातून काय मार्ग काढावा हे घरात कोणाच्याच लक्षात येत नव्हतं; पण आता आजोबांच्या एकदम लक्षात आलं, की आता निर्माण झालेली परिस्थितीही सिद्धीला यातून बाहेर काढण्याची सुवर्णसंधी आहे. ते म्हणाले,
‘पण तुला एक गोष्ट माहितेय का? आता तुमची नेहमीसारखी शाळा नसेल.’
‘माहितेय हो आजोबा. डिजिटल स्कूल असेल; पण त्याच्यामुळे काय फरक पडेल? तेच विषय आणि तेच टीचर्स असणार ना?’
‘नाही ना, मी तेच तर सांगतोय. यावेळी शाळेत तुलापण मजा येईल.’
‘कशी काय?’
‘कारण यावेळी शाळा सुरू होईल तेव्हा अशी एक गोष्ट असणार आहे की, जी इतर कोणालाही येत नाही आणि तुला येते.’
‘शक्यच नाही. असं काही नाहीच आहे.’
‘आहे गं!’
‘काय?’
‘आॅनलाईन शाळा चालविणं.’
‘म्हणजे???’
‘अगं, आता मी रोज बातम्या वाचतो ना, त्यात सर्व म्हणतात, आॅनलाईन शाळा चालविताना तांत्रिक अडचणी येतात. त्या सोडविण्यातच बराच वेळ जातो व मग शिकविणं होत नाही.’
‘का पण? ते सोप्पं असतं एकदम.’
‘पण ते तुमच्या टीचर्सना येत नाही. कारण त्यांनी ते कधी केलं नाहीये.’
‘मग मी शिकवेन ना!’-सिद्धी एकदम उत्साहाने म्हणाली. आणि खरंच, त्यांची शाळा सुरू झाल्यावर सिद्धी सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी ठरली. कारण अभ्यासू मुलं कोणीही असली, तरी शिक्षक सिद्धीच्या मदतीनेच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होते ना!
पालक-शिक्षक-शाळा आणि मुलं यापैकी तुम्ही कुणी आहात का? - असाल तर ‘आॅनलाईन शिक्षणा’च्या तात्कालिक अपरिहार्यतेतून तरून जाण्यासाठी शाळांनी शोधलेले मार्ग, शिक्षकांनी केलेले प्रयोग, आई-बाबांनी शोधलेले पर्याय ‘ऊर्जा’कडे जरूर पाठवा. निवडक मजकुराला या पानावर प्रसिद्धी दिली जाईल.
उपक्रमशील शिक्षक आणि पालकांना ‘युनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून विशेष प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे. ‘ऊर्जा’कडे प्रसिद्धीसाठी आलेल्या मजकुरातून शिक्षक आणि पालकांच्या बक्षीसपात्र लेखांची निवड एक तज्ज्ञ समिती करेल.
युनिकोडमध्ये टाईप केलेल्या लेखांची ओपन फाईल urja@lokmat.com या पत्त्यावर ईमेल करा. संपर्कासाठी फोन नंबर जरूर द्या.