जेईई, नीट परीक्षा वेळेवर न घेतल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता; विद्यार्थी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:58 AM2020-08-28T01:58:44+5:302020-08-28T06:48:19+5:30

केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांचे मत

JEE, the academic year is likely to be wasted if the exams are not taken on time; Students in crisis | जेईई, नीट परीक्षा वेळेवर न घेतल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता; विद्यार्थी संकटात

जेईई, नीट परीक्षा वेळेवर न घेतल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता; विद्यार्थी संकटात

Next

नवी दिल्ली : जेईई (मेन) व नीट या परीक्षा दिवाळीनंतरच्या कालावधीपर्यंत पुढे ढकलायचा निर्णय घेतला तर संपूर्ण शैक्षणिक वर्षच वाया जाईल व त्याचा परिणाम येत्या काही वर्षांच्या प्रवेशप्रक्रियेवर होईल. त्यामुळे या दोन्ही परीक्षा यंदा वेळेवर घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांनी सांगितले.

अमित खरे म्हणाले की, जेईई (मेन) व नीट या दोन परीक्षा यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये होणार होत्या. कोरोनाच्या साथीमुळे त्या परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले. आता या परीक्षा दिवाळीनंतरच घ्या, असे काही विद्यार्थी म्हणत आहेत.

त्यांनी सांगितले की, दिवाळीनंतर उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी छटचा उत्सव २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. समजा त्याच्या एक आठवड्यानंतर जेईई (मेन) व नीट या परीक्षा घ्यायचे ठरविले तर त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या लागतील व त्याचे निकाल पुढील वर्षी जाहीर होतील. म्हणजे एक पूर्ण शैक्षणिक वर्षच वाया जाण्याचा धोका आहे.

ममता यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कोरोनामुळे जेईई (मेन) व नीट परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांच्याकडे केली होती. कोरोना काळामध्ये परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

2021 वर्षातील प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी पूर्वी होत्या तितक्याच जागा राहणार आहेत. त्यांची संख्या दुप्पट होणार नाही याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच यंदाचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे थोडे उशिरा का होईना; पण नोव्हेंबरमध्ये सुरू करायचे आहे. यंदाची शैक्षणिक सत्रे कमी कालावधीची व कमी सुट्यांची राहतील; पण आॅगस्ट २०२१ मध्ये पुढील बॅच दाखल व्हावी, असे उद्दिष्ट आम्ही राखले आहे. सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांनी सांगितले.

Web Title: JEE, the academic year is likely to be wasted if the exams are not taken on time; Students in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा