शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!; शिक्षण मंत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:45 PM2021-10-12T19:45:55+5:302021-10-12T19:46:46+5:30
आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला ...
आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. शाळेची फी भरू न शकल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं हॉल तिकीट देण्यास विद्यार्थिनीला नकार दिला होता. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील कोराटागेरे शहरातील १६ वर्षीय ग्रीष्मा नायक हिच्यासोबत ही घटना घडली होती. ग्रीष्मा हिनं हॉल तिकीट न मिळाल्यानं आत्महत्येचा विचार केला होता. पण या घटनेवर मात करुन ग्रीष्मा नायक हिनं इयत्ता १० वीच्या पुरवणी परीक्षेत टॉप केलं आहे.
ग्रीष्मा नायक शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिला आता चांगल्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी) प्रवेश घ्यायचा आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार ग्रीष्मानं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बोर्डाची तयारी सुरू केली होती. "कोरोना संकटामुळे शाळेची फी भरणं शक्य नव्हतं. त्यामुळे शाळेनं वर्गात बसवण्यास नकार दिला. पण माझी मोठी बहिण कार्थाना हिनं मुख्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी मला खूप मदत केली. परीक्षेच्या तीन महिन्यांआधीपासूनच भाषेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. पण फी न भरल्यामुळे शाळेकडून आपलं नाव रजिस्टर न केल्याचं लक्षात आल्यानंतर मी खूप खचले होते", असं ग्रीष्मानं सांगितलं.
डॉक्टर होण्याचं ग्रीष्माचं स्वप्न
ग्रीष्माचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ती नक्की पूर्ण करेल अशी खात्री तिच्या आई-वडिलांना आहे. ग्रीष्मा इयत्ता ९ वीपर्यंत दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अल्वा येथील इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. शाळेची फी न भरल्यामुळे तिला शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. इतकंच नव्हे, तर दहावीच्या परीक्षेसाठी तिच्या नावाची देखील शाळेनं नोंदणी केली नाही. शाळेनं तिला हॉल तिकीट देण्यास नकार दिला होता.
शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर मिळाली परीक्षेला परवानगी
ग्रीष्माच्या आई-वडिलांनी शाळेविरोधात थेट पब्लिक इंस्ट्रक्शन विभागातील उप-संचालकांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण थेट तत्कालीन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांच्यापर्यंत पोहोचलं. राज्यभरातून अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्यानंतर शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नाकारण्याच्या घटना होणार नाहीत याची काळजी शाळेनं घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. इतकंच नव्हे, तर मंत्री सुरेश कुमार यांनी थेट ग्रीष्माची राहत्या घरी भेट घेऊन तिला पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं.
ग्रीष्मानं मिळालेल्या संधीचं सोनं करत परीक्षेत अव्वल क्रमांक प्राप्त केला. याची माहिती एस कुमार यांना मिळताच ग्रीष्मा आता इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनली आहे, असं वक्तव्य केलं आहे.