कार्तिक जिवानींची यशोगाथा; 4 वेळा UPSC दिली, तीनदा पास झाले; IPS-IAS दोन्ही पदे मिळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:32 IST2025-03-04T16:30:55+5:302025-03-04T16:32:08+5:30
दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, मात्र मोजक्याच उमेदवारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते.

कार्तिक जिवानींची यशोगाथा; 4 वेळा UPSC दिली, तीनदा पास झाले; IPS-IAS दोन्ही पदे मिळवली
UPSC EXAM : दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, मात्र मोजकेच पास होऊन अधिकारी होतात. काही उमेदवारांना यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तर काहीजण एकदाही उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. काही उमेदवार असेही आहेत, जे एक-दोन नव्हे, तीनदा यूपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत, ज्याने 4 वेळा UPSC परीक्षा दिली अन् आपल्या मनासारखे पद मिळवले.
गुजरातचे रहिवासी असलेले कार्तिक जिवानी UPSC परीक्षेद्वारे IPS अधिकारी झाला, पण त्यांचे IAS होण्याचे स्वप्न होते. म्हणूनच त्यांनी आपला अभ्यास तसाच सुरु ठेवला.
IT मुंबईतून मेकॅनिकल इंजिनीअरिंग
गुजरातच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक जिवानीने आठवी इयत्तेपर्यंत गुजराती माध्यमातून शिक्षण घेतले. यानंतर त्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आणि बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षा देऊन आयआयटी मुंबईत प्रवेश मिळवला. येथून त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.
दुसऱ्या प्रयत्नात IPS
इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर कार्तिकने 2016 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला. पण हार न मानता, त्याने पुढची दोन वर्षे मेहनत घेतली आणि 2019 मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर 94 वा क्रमांक मिळवला. कार्तिकचा आयएएस फक्त दोन रँकने चुकला, मात्र त्याची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.
चौथ्या प्रयत्नात IAS
आयपीएस प्रशिक्षण सुरू केल्यानंतरही जिवानी यांनी आयएएसची तयारी सुरूच ठेवली. त्यांनी 2019 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात 84 वा रँक मिळवला, पण आयएएस पद मिळाले नाही. अखेर, 2020 मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी 8 वा रँक मिळवला आणि या रँकसह कार्तिक जिवानी IAS अधिकारी झाले.
दिवसातून 10 तास अभ्यास करुन मिळवले यश
कार्तिक जीवनी दररोज 10 तास अभ्यास करायचे. त्यांचा बहुतांश अभ्यास रात्रीच होत असे. ते केवळ पुस्तकांवर अवलंबून राहिले नाही, तर त्यांनी ऑनलाइन उपलब्ध साहित्याचा वापर केला आणि अनेक नोट्स तयार केल्या. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले.