तुमच्या सवडीनुसार जे हवे ते शिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 08:19 AM2022-06-05T08:19:37+5:302022-06-05T08:19:51+5:30
Education : आता ऑनलाइन शिक्षण शब्द उच्चारल्यावर घरात मोबाइलच्या स्क्रीनद्वारे शाळा शिकणारी मुले, हेच चित्र डोळ्यापुढे आले असेल; पण तसे नाही तर, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, कोणत्याही वयाचे असा.
नोकरी-धंद्यातील रोजच्या धावपळीत अनेक वेळा इच्छा असूनही आवडत्या गोष्टी शिकायच्या राहून जातात. ही परिस्थिती अगदी गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत होती; पण कोव्हिड काळात तंत्रज्ञानाचे नवीन आविष्कार जन्माला आले. त्यातीलच एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे ऑनलाइन शिक्षण. आता ऑनलाइन शिक्षण शब्द उच्चारल्यावर घरात मोबाइलच्या स्क्रीनद्वारे शाळा शिकणारी मुले, हेच चित्र डोळ्यापुढे आले असेल; पण तसे नाही तर, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, कोणत्याही वयाचे असा. तुमच्या आवडीचे विषय आता तुम्हाला ऑनलाइन शिकता येतील.
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय?
- याचे सोपे उत्तर म्हणजे, मोबाइल अथवा कॉम्प्युटरवरून इंटरनेटच्या माध्यमातून विशिष्ट लिंक अथवा वेबसाईटच्या माध्यमातून मिळणारे शिक्षण. लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक संस्थांनी झूम, गुगल मीट आदींद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मात्र, या पलीकडे जात मुंबई, दिल्लीतील काही तरुणांनी एकत्र येत ऑनलाइन शिक्षणासाठी काही अभिनव वेबसाईटची निर्मिती केली आणि या वेबसाईटद्वारे हजारो प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
यामध्ये काय शिकायला मिळते?
- युडेमी, कोर्सेरा या ऑनलाइन शिक्षणामधील अग्रगण्य वेबसाईट म्हणून लोकप्रिय आहेत. या वेबसाईटवर आजच्या घडीला अक्षरशः शेकडो विषयांचे हजारो कोर्सेस उपलब्ध आहेत. उदाहरण सांगायचे तर, फोटोग्राफी हा साधा विषय घेतला तरी, डिजिटल फोटोग्राफी, मोबाइल फोटोग्राफी, स्टील फोटोग्राफी, प्रॉडक्ट फोटोग्राफी असे त्यात किमान १० प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
याची रचना कशी असते?
- विषयानुसार यामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
- ज्या विषयाचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्याचे व्हिडिओ, ॲनिमेशनद्वारे सादरीकरण केले जाते.
- या वेबसाईटमधील अनेक कोर्सेसच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ हे संबंधित विषयांतील तज्ज्ञांकडून तयार करून घेण्यात आले आहेत.
- थेट तज्ज्ञांकडून आपल्या आवडीचा विषय शिकता येतो.
- प्रत्येक कोर्स हा किमान दीड तास ते कमाल पाच तासांपर्यंत आहे.
- एकाच वेळी कोर्स पूर्ण करण्याची सक्ती नाही. त्यामुळे आपल्या सोयीनुसार प्रत्येक मॉड्यूल शिकता येते.
- या कोर्सेसचे शुल्कदेखील माफक आहे.