लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी कुणाला मत द्याल? जाणून घ्या नामांकनं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:10 PM2023-04-13T17:10:10+5:302023-04-13T17:10:41+5:30

शिक्षक या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.

Lokmat Maharashtrian of the Year 2023 Who will you support for outstanding achievements in the field of education Know the nomination | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी कुणाला मत द्याल? जाणून घ्या नामांकनं...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३: शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी कुणाला मत द्याल? जाणून घ्या नामांकनं...

googlenewsNext

लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. शिक्षक या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे.
 

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी बोलतात जपानी, जर्मन
धनंजय पकडे, प्रभारी मुख्याध्यापक, जि.प.शाळा, जि. नागपूर

नरखेड तालुक्यातील थूगाव निपाणी जि. प. उच्च प्राथमिक शाळेत पदोन्नतीने नियुक्त झालेले विज्ञान शिक्षक धनंजय पकडे यांनी अशी काही जादूची कांडी फिरविली की, ही शाळा आज जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. २०१८ मध्ये विज्ञान शिक्षक म्हणून त्यांची थूगाव निपाणी येथे बदली झाली. रुजू झाल्यानंतर पटसंख्या केवळ ४६ होती. सुरुवातीला त्यांनी नि:शुल्क बालसंस्कार शिबिर राबविले. उन्नती विद्यार्थी बचत बँकेची सुरुवात करून बचतीचे धडे दिले. आज शाळेतील विद्यार्थ्यांचे या बँकेत ६८,५०० रूपये जमा आहेत. या बँकेचा सर्व व्यवहार शाळेतील विद्यार्थीच सांभाळतात. मराठी शाळेत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेचे शिक्षण सुरू केले. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी इंग्रजीत तरबेज झाले. त्यांनी जपानी व जर्मन भाषा शिकविण्याला सुरुवात केली. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

पोरांच्या भवितव्यासाठी गणितासह इंग्रजी केले सोपे 
राजेश कोगदे, जि. प. शाळा हिंगणा, बुलढाणा

गणितासारखा रूक्ष विषय आनंददायी पद्धतीने शिकविण्याची हातोटी लाभलेले बुलढाण्यातील खामगाव तालुक्याच्या जि. प. म. उच्च प्राथमिक शाळा हिंगणा कारेगाव येथील शिक्षक राजेश कोगदे हे जिल्हाभरात लोकप्रिय झाले. गुणाकार, भागाकारसारख्या गणितीय प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी भागाकाराची सुलभ पद्धती शोधून काढली असून, या पद्धतीच्या आधारे पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा भागाकार सोडवू शकतात. यावर्षी विद्या परिषद, पुणेकडून सर्वोत्कृष्ट अध्यापन पद्धती म्हणून निवड झाली असून, ही पद्धती केंद्र शासनाच्या दीक्षा ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इंग्रजी वाचन सुलभ करण्यासाठी इंग्लिश एक्स्प्रेस, गणित विषयाची भीती घालवण्यासाठी गणित गार्डन तयार केले. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

शालेय अभ्यासक्रम घरांच्या भिंतीवर रंगविला
राम गायकवाड, आशा मराठी विद्यालय, सोलापूर

कोविड काळात सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू होते गरीब मुलांना ते परवडत नव्हते. सोलापुरातील नीलम श्रमजिवीनगर या परिसरातील आशा मराठी विद्यालय, धर्माण्णा सादूल प्रशालेतील विडी व यंत्रमाग कामगारांची मुलं देखील या अभ्यासापासून वंचित राहिली. गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत, यासाठी शाळेतील शिक्षक राम गायकवाड यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला. त्यांनी शालेय अभ्यासक्रम चक्क या परिसरातील घरांच्या भिंतीवर रंगविला. मुले खेळताना, या परिसरातून फिरताना भिंतींवर रेखाटलेले अभ्यासक्रम वाचू लागली, त्यामुळे पालक राम गायकवाड यांच्याकडे येऊन आमच्याही भिंतीवर अभ्यासक्रम रंगवा, अशी विनंती करू लागले. या उपक्रमामुळे ज्यांच्याकडे मोबाइल नाही, असे विद्यार्थी देखील नियमितपणे अभ्यास करू लागले.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

...आणि माळरानावर भरली शाळा!
संतोष दळवी, पिसावरे माध्यमिक विद्यालय, जि. पुणे

पिसावरे माध्यमिक विद्यालयात पक्षी निरीक्षण मंडळाची स्थापना करून पर्यावरण जागृतीचे काम सुरू केले. विद्यार्थ्यांना ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात (रविवारी) निरीक्षणास नेण्यात येते. आतापर्यंत परिसरात १९० पक्ष्यांच्या प्रजाती नोंदविण्यात आल्या आहेत. इला फाउंडेशनच्या उपक्रमाद्वारे चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करून त्याच्या नोंदी ठेवण्यात आल्या. नोंदीची वनविभागाच्या पुस्तकात दखल घेण्यात आली. या उपक्रमांतर्गत चिमण्यांची शाळा व नंतर पिसावरे गावात २०० पेक्षा जास्त घरटी लावून पिसावरे हे चिमण्यांचे गाव केले. गेले ३ वर्षे बिग बटरफ्लाय मंथ या देशस्तरीय उपक्रमात आयोजक म्हणून सहभाग घेतला. सप्टेंबर महिन्यात मुले, शिक्षक शाळा सुटली की माळरानावर जातात. महिनाभर फुलपाखरांची माहिती गोळा केली जाते.
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड 
उषा ढेरे-करपे, सहशिक्षिका, जि. प. शाळा, ढेकणमोहा, बीड

बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एके काळी नामांकित शाळा होती. पंचक्रोशीतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत. कधी काळी ७००-८०० विद्यार्थी, १४ - १५ शिक्षक असलेल्या शाळेला उतरती कळा लागली. विद्यार्थीपट घसरून पहिली ते चौथीची विद्यार्थी संख्या ७ एवढीच राहिली. शाळा शेवटच्या घटका मोजू लागली. २०१८ साली ऑनलाइन बदल्यानंतर उषा बप्पासाहेब ढेरे रुजू झाल्या. ढेकणमोहा गावकऱ्यांनी शालेय समिती सदस्यांच्या मदतीने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन, लोकांची बोलणी ऐकून, हेटाळणी, शाळेविषयी नकारात्मक भावना हे सगळे पचवून पहिल्या दिवशी १० प्रवेश मिळवले आणि सुरू झाली सावित्रीच्या लेकींची शाळा. आज पाचव्या वर्षी विद्यार्थी संख्या ५ वरून ६६ झाली आहे. पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून शाळेत मुले टिकविण्याची किमया साधली. 
मत देण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2023 Who will you support for outstanding achievements in the field of education Know the nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.