अकरावी प्रवेश प्रक्रिया : आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ५२ प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 08:47 AM2021-12-26T08:47:48+5:302021-12-26T08:48:21+5:30
Maharashtra 11th Admission : आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे.
मुंबई : ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अकरावी प्रवेश घेतले नाहीत, त्यांना प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण संचालनालयाने दिली आहे. या शेवटच्या फेरीसाठी राज्यात १ लाख ६३ हजार ९७८ जागा रिक्त आहेत. यात सर्वाधिक जागा रिक्त राहण्याचे प्रमाण नागपूर जिल्ह्यात असून तेथे एकूण प्रवेशाच्या ४२ टक्के जागा रिक्त आहेत. तर सर्वात कमी जागा नाशिक जिल्ह्यात उपलब्ध असून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण २४ टक्के आहे.
आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे. उपलब्ध असलेल्या २५,८३० जागांपैकी १९,२६१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अंतिम फेरीसाठी आता ६,११९ जागा उपलब्ध आहेत. नागपुरात अकरावीचे सगळ्यात कमी प्रवेश झाले आहेत. उपलब्ध असलेल्या ५९,१९५ जागांपैकी केवळ ३३,९५० जागांवर प्रवेश होऊ शकले आहेत आणि आता २५,२४५ जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध आहेत.
८७,००० जागा मुंबई विभागात
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या फेरीसाठी मुंबई विभागात ८७,५९८ जागा उपलब्ध आहेत. मुंबईत ३ लाख २१,७८० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ३४ हजार १८२ जागांवर आतापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. रिक्त जागांची टक्केवारी २७ टक्के इतकी आहे.
राज्यात ५ लाख ३६ हजार ०३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या त्यापैकी ६९ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले असून ३१ टक्के जागा रिक्त असून पुढील शेवटच्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
शेवटच्या फेरीसाठी राज्यातील अकरावी प्रवेशाच्या उपलब्ध जागा
विभाग प्रवेश क्षमता प्रवेश निश्चित रिक्त जागा
अमरावती १६२३० १०४६६ ५७६४
मुंबई ३,२१,७८० २,३४,१८२ ८७, ५९८
नागपूर ५९,१९५ ३३,९५० २५२४५
नाशिक २५३८० १९२६१ ६११९
पुणे १,१३,४४५ ७४,१९३ ३९,२५२
एकूण ५,३६,०३० ३,७२,०५२ १,६३,९७८