मोठी बातमी! दहावी-बारावी पाठोपाठ वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या; वैद्यकीय शिक्षणमंत्र्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:15 PM2021-04-15T13:15:39+5:302021-04-15T13:17:16+5:30
या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल
मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.या परीक्षा पुढे ढकलणे बाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
दोन दिवसापूर्वीच दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या होत्या. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक सोमवारी घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत आपले आरोग्य हीच आपली प्राथमिकता असल्याने दहावी, बारावीच्या राज्यातील तब्बल ३० लाख विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लक्षात घेऊन दहावी, बारावीच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल व नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले होते.
कार्यप्रणाली निश्चित करण्याचे दिले निर्देश
परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, तसेच याची एक परिपूर्ण कार्यप्रणाली (एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. ज्या तारखांना १२च्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात, यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावे, परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे.