मुलांनो, भांडा - शिक्षणाची ‘मिमामोरु’ पद्धत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:18 AM2021-06-02T05:18:40+5:302021-06-02T05:18:47+5:30
काळ बदलला तसा शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी सारंच बदललं. मुलांना शिक्षकांनी मारणं हा गुन्हा समजला जाऊ लागला. मुलांच्या मानसिकतेच्या दृष्टीनं ते बरोबरच आहे; पण त्यामुळे मारकुट्या शिक्षकांची जमात जवळजवळ सर्व जगातूनच जणू संपुष्टात आली.
पूर्वीच्या शाळा आणि शिक्षक कसे होते, याबाबत बहुतेकांना माहीत आहे. शाळा, कॉलेज सुटून आता नोकरीधंद्याला लागलेले जे पालकवर्गातील मध्यमवयीन लोक आहेत, ते तर नेहमीच आपल्या शाळेचं, आपल्या शाळेतील शिक्षकांचं तोंडभरून कौतुक करताना आपल्याला दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही शाळाही मारकुटी आणि त्यातील शिक्षक तर एकाहून एक मारकुटे असायचे. विद्यार्थ्याने शिक्षकाचा मार खाल्ला नसेल आणि तो ‘सरळ’ झाला नसेल असा एकही विद्यार्थी तेव्हा जणू सापडायचा नाही. या मारकुट्या शिक्षकांमुळेच मी सुधारलो आणि माझं आयुष्य लायनीला लागलं, असं सांगणारे तर लक्षावधी पालक आपल्याला मिळतील. “त्यांनी जर मला बुकलून आणि बमकावून काढलं नसतं, तर मी असाच वाया गेलो असतो,” असं सांगताना त्या मारकुट्या शिक्षकांविषयीची अपार कृतज्ञताही त्यांच्या शब्दाशब्दांतून ओसंडून वाहत असते.
ही झाली शिक्षकांची गोष्ट; पण पालकांची गोष्ट आणखीच वेगळी होती. आपल्या पाल्याला गुरुजींनी शाळेत मारलं, म्हणून तक्रार घेऊन एकही पालक शाळेत गेला नसेल, उलट आपल्याच कार्ट्यानं काही तरी उपद्व्याप केला असेल, म्हणून त्याच्या आणखी दोन थोतरीत दिल्या असतील. मित्रामित्रांची, शाळेतील वर्गदोस्तांची भांडणं तेंव्हाही व्हायचीच, चांगली हमरीतुमरीनं, पण या मुलानं मला मारलं, म्हणून एकाही पोरानं हे भांडण कधी घरापर्यंत नेलं नसेल. सगळं बाहेरच्या बाहेर आणि आपसांतच मिटवून घ्यायचं!
काळ बदलला तसा शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी सारंच बदललं. मुलांना शिक्षकांनी मारणं हा गुन्हा समजला जाऊ लागला. मुलांच्या मानसिकतेच्या दृष्टीनं ते बरोबरच आहे; पण त्यामुळे मारकुट्या शिक्षकांची जमात जवळजवळ सर्व जगातूनच जणू संपुष्टात आली. मुलांच्या कलानं घेणं आणि शिकणं ही नवी पद्धत सुरू झाली. पालक तर आपल्या पाल्याकडे डोळ्यांत तेल घालून इतकं लक्ष घालू लागले आणि इतके त्यांच्या आयुष्यात लुडबुड करू लागले की विचारायला नको.
शाळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं चित्र कसं आहे? मुलांना मारणं आता कायद्यानंच बंद झालं आहे. मुलांकडे शाळा, शिक्षक, पालक नको इतकं लक्ष देतात. दोन मुलांमध्ये भांडण किंवा साधी बाचाबाची झाली तरी लगेच शिक्षक मध्ये पडतात. त्यांचं भांडण सोडवतात, त्यांना समजावतात आणि त्यांना आपापल्या जागेवर बसवतात. पालक तर त्या दुसऱ्या मुलाशी, त्याच्या पालकांशी आणि शिक्षकांशीच भांडायला येतात.. हे फक्त आपल्याकडेच नाही, अख्ख्या जगात हाच प्रकार चालतो.
याला थोडा छेद देणारा प्रकार जपानच्या शाळांमध्ये प्रचलित आहे आणि सध्या जगभरात त्याचा बोलबाला आहे. जपानमधल्या या पद्धतीचं नाव आहे ‘मिमामोरु’! ‘मिमा’ म्हणजे लक्ष ठेवणं आणि ‘मोरु’ म्हणजे रक्षण करणं. इंग्रजीत याला ‘टीचिंग बाय वॉचिंग’ असंही म्हटलं जातं.
शाळेत मुलं भांडण करीत असतील, दंगामस्ती करीत असतील, एकमेकांशी झोंबत असतील, तर शिक्षक जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. ते तिथेच असतात, या भांडणाकडे त्यांचं लक्षही असतं; पण मुलांचं भांडण सोडवायला शिक्षक पुढे येत नाहीत. प्रकरण जर अगदीच हाताच्या बाहेर गेलं तरच हे शिक्षक त्यात पडतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ही पद्धत फारच अफलातून आहे. मुलांना स्वायत्तता मिळवून देण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या संधी यामुळे मुलांना मिळतात. कोणत्या परिस्थितीत काय केलं पाहिजे, आपण दुसऱ्याशी असहमत असलो तरी निवड आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळे मुलांमध्ये विकसित होते.
मुलं भांडणं, मारामाऱ्या करीत असताना शिक्षकांनी, पालकांनी तटस्थ राहाणं हे विचित्र वाटू शकतं; पण ही पद्धत खूपच उपयुक्त आणि प्रभावी असल्याचं दिसून आल्यानं हिरोशिमा युनिव्हर्सिटीनं यासंदर्भात शास्त्रीय अभ्यासच केला. यात जपानी आणि अमेरिकन तज्ज्ञ शिक्षक सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या मानवता आणि सामाजिक विज्ञान विषयक तज्ज्ञ फुमिनरी नाकत्सुबो यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या झगड्यात मोठे का पडत नाहीत, याचा अभ्यास करण्यात आला आणि त्याचे आश्चर्यजनक फायदे दिसून आले. प्रत्येक परिस्थितीत आपले आपणच निर्णय घेत असल्याने त्यातला बरेवाईटपणा त्यांना कळतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व सुधारणेसाठी त्याचा फारच उपयोग होतो.
मुलांच्या भांडणात मोठ्यांनी लगेच लक्ष देणं, दखल देणं यामुळे मुलांच्या स्वत:हून शिकण्याच्या अनेक संधी आपण त्यांच्याकडून हिसकावून घेतो. अमेरिकन तज्ज्ञांचं याबाबत म्हणणं आहे, आपल्या सर्वच शैक्षणिक धोरणात काही बदल आवश्यक आहेत. ‘मिमामोरु’ पद्धतीची योग्य अंमलबजावणी केल्यास हे तंत्र केवळ अमेरिकेतच नव्हेतर, जगभरात फायदेशीर ठरू शकतं.
‘मिमामोरु’ची तीन वैशिष्ट्यं
‘मिमामोरु’ पद्धतीची तीन वैशिष्ट्ये आहेत. १- मुलांची जोखीम कमी करण्यासाठी मोठ्यांचा कमीतकमी हस्तक्षेप. २- आपल्या समस्यांचं स्वत:च निराकरण करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणं आणि ३- मोठ्यांच्या मदतीशिवाय आपलं भांडण आपण सोडवणं.