अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार साडेसात लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज; ‘असा’ करता येईल अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 08:02 AM2022-07-23T08:02:24+5:302022-07-23T08:05:56+5:30
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नवे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आता सुरू होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.
अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, टूरिझम, पत्रकारिता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी वयोमर्यादा १६ ते ३२ वर्षे आहे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपयांपेक्षा कमी असावी. राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून, यामधून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १८ ते ३२ वर्षे असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत. दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त ३ टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्षांत कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.
असा करता येईल अर्ज
योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा ०२२-२२६५७९८२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.