1 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सुचविले अभ्यासक्रम, आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन, फिटर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 08:54 AM2022-11-17T08:54:18+5:302022-11-17T08:55:12+5:30
Education: आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील तब्बल १ लाख ३३ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. इलेक्ट्रिशियन असणाऱ्या जवळपास २७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात अभ्यासक्रम सुचविले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेंबरपर्यंत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. यामध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांत १ लाख ११ हजारांहून अधिक मुलांचा, तर २२ हजारांहून अधिक मुलींचा समावेश आहे.
कोणत्या जिल्ह्यातून किती प्रतिसाद
कोल्हापूर : १५ हजार विद्यार्थी
वाशीम : ८ हजार
भंडारा : ७ हजार
अमरावती, जालना : ६ हजार
विद्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद स्पर्धेत दिला आहे. या माध्यमातून त्यांना उपयुक्त आणि हव्या असणाऱ्या अल्प मुदतीचे अभ्यासक्रम त्यांना उपलब्ध करून देता येणार आहेत. यामुळे त्यांचा कल आणि रुची, तर वाढेलच शिवाय कौशल्याधारित मनुष्यबळ निर्मितीसाठी मदत होईल.
- दिगंबर दळवी,
संचालक, राज्य आयटीआय
प्रथम वर्षाच्या ६२ टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग
आयटीआयमधील प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या ८३ हजार ४७२, द्वितीय वर्षाच्या ३६ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. आयटीआय उत्तीर्ण १३ हजार ४२८ माजी विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम सुचविले आहेत. सगळ्यात जास्त प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी सर्वाधिक म्हणजे ६२ टक्क्यांहून अधिक अभ्यासक्रम सुचविले आहेत.